
Department of Revenue : उद्दिष्ट ५४ कोटींचे, वसुली ९२ कोटींची; गौण खनिजची १७१ टक्के वसुली
अकोला : राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने जिल्ह्याचे गौण खनिज महसूल वसूलीचे उद्दिष्ट गत वर्षीच्या तुलनेत २२ कोटींनी कमी केल्यामुळे २०२२-२३ या आर्थिक वर्षात गौण खनिजची वसुली १७१.१९ टक्के झाली आहे.
शासनाने ५४ कोटी २३ लाखांचे उद्दिष्ट दिलेले असताना प्रत्यक्षात ९२ कोटी ८३ लाख ४३ हजारांची वसुली झाली आहे. आर्थिक वर्षा अखेर चांगला महसूल शासनाच्या तिजोरीत जमा केल्यामुळे खनिकर्मच्या कामाचे कौतूक होत आहे.
राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला प्रत्येक वर्षी गाैण खनिजावर स्वामित्वधन वसुलीचे उद्दिष्ट देण्यात येते. संबंधित उद्दिष्ट पूर्तीसाठी जिल्हा प्रशासन प्रत्येक वर्षी प्रयत्न करते. त्यासाठी जिल्ह्यातील गिट्टी खदानींसह वाळू घाटांचा लिलाव करण्यात येतो, तर मुरूम व इतर गौण खनिजांच्या खदानींचा लिलाव करून महसूल गोळा करण्यात येतो. या व्यतिरीक्त अवैध मार्गाने गौण खनिज उत्खननाच्या घटना सुद्धा नेहमीच घडतात.
गौण खनिज माफियांवर महसूल व पाेलिस प्रशासनाच्या वतीने कारवाई देखील करण्यात येते. त्यातून जिल्हा प्रशासनाला महसूल प्राप्त होतो. सदर महसूल वसुलीचे उद्दिष्ट शासनामार्फत खनिकर्म विभागाला देण्यात येते. त्यानुसार आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी जिल्हा खनिकर्म विभागाला ५४ कोटी २३ लाख रुपयांच्या महसूल वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते.
गत दोन वर्ष उद्दिष्टात सतत वाढ केल्यानंतर यंदा उद्दिष्ट कमी केल्याने खनिकर्म विभागाने आर्थिक वर्ष संपायला जेमतेम चार महिने बाकी असतानाच उद्दिष्टापार वसुली केली होती. त्यांतरच्या महिन्यात वसुलीत अधिक भर पडत गेल्यामुळे आर्थिक वर्षाअखेर खनिकर्म विभागाने ९२ कोटी ८३ लाख ४३ हजारांचा महसूल शासनाकडे जमा केला. आर्थिक वर्षाअखेर वसुलीची टक्केवारी वाढल्याने जिल्ह्यासाठी कौतुकाची बाब आहे.
आतापर्यंत झालेली गौण खनिज वसुली
तालुका उद्दिष्ट वसुली
अकोला १५ कोटी ५० लाख ३१ कोटी ५८ लाख ६५ हजार
अकोट ६ कोटी ५० लाख ११ कोटी ८३ लाख ४४ हजार
तेल्हारा १ कोटी २१ लाख १४ हजार
बाळापूर १ कोटी ७३ लाख २ कोटी ८३ लाख ३८ हजार
पातूर ७ कोटी ५ कोटी ७६ लाख ३३ हजार
मूर्तिजापूर १५ कोटी ५० लाख १८ कोटी १८ लाख ४६ हजार
बार्शीटाकळी ७ कोटी १७ कोटी ७६ लाख १८ हजार
जिल्हा कार्यालय ०० १ कोटी ६२ लाख ११ हजार
वाळू लिलाव ०० ३ कोटी ३ लाख ७४ हजार
बार्शीटाकळी पुढे; तेल्हारा मागे
जिल्ह्यातील सात तालुक्यांपैकी बार्शीटाकळी तालुक्यात सर्वाधिक २५३.७५ टक्के, अकोटमध्ये २०३.७८, अकोटमध्ये १८२.०७, बाळापूरात १६३.८०, मूर्तिजापूरात ११७.३२ टक्के, पातूरमध्ये ८२.३३ तर तेल्हारा तालुक्यात सर्वात कमी २१.१४ टक्केच उद्दिष्ट पूर्ती झाली आहे.