
Exam: शिक्षकांसाठीच्या ‘टेट’ परीक्षेत सावळा गोंधळ
मुंबई - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून शिक्षकांच्या नियुक्तीसाठी २२ फेब्रुवारीपासून शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा (टेट) घेतली जात आहे.
परंतु ‘आयबीपीएस’ला ‘टेट’ परीक्षेबाबत माहिती नसल्याने सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत परीक्षा परिषदेकडे तक्रारी करूनही त्याची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याचा दावा उमेदवारांनी केला आहे.
राज्य परीक्षा परिषदेकडे सर्व यंत्रणा असतानाही शिक्षण विभागाने ‘टेट’ परीक्षा घेण्याचे काम ‘आयबीपीएस’ला दिले आहे. या परीक्षेला राज्यभरातून तब्बल दोन लाख ३९ हजार उमेदवारांनी नोंदणी केली आहे.
ही परीक्षा २२ फेब्रुवारीपासून सुरू झाली असून तीन मार्चपर्यंत चालणार आहे. परीक्षेसाठी ‘आयबीपीएस’ने योग्य नियोजन केले नसल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. २०० गुणांची प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ दिला आहे.
हा वेळ अपुरा असल्याने आमच्या शिक्षण होण्याच्या स्वप्नाला लगाम लावला जात असल्याची प्रतिक्रिया अनेक उमेदवारांनी व्यक्त केल्या आहेत.
आयुष्यातील सात ते आठ वर्षे तयारीसाठी गेली. त्यात आता वयोमर्यादा संपत आल्याने ‘टेट’ परीक्षेने आयुष्याचा खेळखंडोबा केल्याचे मत एका उमेदवाराने समाज माध्यमावर नोंदवले आहे.
उमेदवारांचे आक्षेप काय?
पासवर्ड संगणक प्रणालीद्वारे आपोआप तयार होत असल्याने परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्हपरीक्षेतील २०० प्रश्नांसाठी १२० मिनिटांचा वेळ अपुरा
‘आयबीपीएस’ला मराठीची माहिती नसल्याने परीक्षेत मराठी व्याकरण तसेच साहित्यावर प्रश्न नाही.परीक्षेचा निश्चित अभ्यासक्रम आणि ऐनवेळी येणारे प्रश्न याबाबतही गोंधळ
सन २०१७ च्या शासन निर्णयानुसार आयबीपीएसने ऑनलाइन परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्नावली तयार केली आहे. शासन निर्णयानुसारच परीक्षेसाठी दोन तासांचा अवधी दिला आहे.
समान काठिण्य पातळीनुसार प्रश्नपत्रिका निश्चित केली आहे. अभ्यास न केलेल्या उमेदवारांना प्रश्न अवघड वाटत असतील. परीक्षा संपताच पुढील आठवड्यात निकाल जाहीर होईल.
- महेश पालकर, अध्यक्ष, राज्य परीक्षा परिषद, पुणे