(Video) मस्तच... बोलीभाषेतून शिकविण्याची कला सातासमुद्रापार; लोटपोट होऊन विद्यार्थी करतात ज्ञानार्जन

teacher Nitesh Karale who teaches students through Dialect
teacher Nitesh Karale who teaches students through Dialect

वर्धा/नागपूर  : भूगोलातला लाव्हारस, मराठीतले व्याकरण आणि इतिहास व गणितासारखे कंटाळवाणे विषय विद्यार्थ्यांना शुद्ध भाषेत शिकविल्यास मेंदूत शिरत नाही. मात्र हेच विषय त्यांना त्यांच्या बोलीभाषेत शिकविले तर पटकन समजतात. नेमका हाच धागा पकडून मी आपल्या शिकविण्याची शैली बदलली. सुदैवाने हा फंडा यशस्वी ठरला, अशी भावना ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खदखद हसविणारे व अल्पावधीतच जगभर लोकप्रिय झालेले वैदर्भीय शिक्षक नितेश कराळे यांनी व्यक्त केल्या.

वर्धा जिल्ह्यातील मांडवा येथील हे मास्तर त्यांच्या शिकविण्याच्या 'हटके' शैलीमुळे सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत. त्यांच्या खुमासदार ऑनलाईन वर्गाचे व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून अनेकांचे मनोरंजन करीत आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना धडे देताना मायबोलीतून लावलेला अस्सल वऱ्हाडी तडका अनेकांना भावतो आहे. दैनिक 'सकाळ'ने सर्वप्रथम त्यांचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स प्रसारमध्यमांनीही दाखल घेत त्यांना लोकप्रियततेच्या शिखरावर पोहोचविले. कराळे यांची चर्चा केवळ विदर्भातच नाही. सातासमुद्रापार अमेरिका व दुबईमध्येही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची कीर्ती गेली आहे.

बीएस्सी बीएड शिक्षण झालेल्या कराळे यांनी काही वर्षांपूर्वी स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी पुण्यात क्लासेस केले. क्लास करून नोकरीसाठी हातपाय मारले. मात्र अथक प्रयत्न करूनही हाती निराशा आल्याने अखेर 2013 मध्ये फोनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकादमी नावानं स्पर्धा परिक्षेचा 'पुणेरी पॅटर्न' सुरू केला. कराळे गावात राहिल्याने त्यांना गावाची बोलीभाषा चांगलीच अवगत होती. 

याच अस्सल वऱ्हाडी बोलीचा त्यांनी शिकविताना वापर केला. ऑफलाईन क्लास सुरू असताना देखील ते वऱ्हाडीतच शिकवत होते. त्यांनी आपल्या या वऱ्हाडी बोलीतून अनेकांना शिकवत शासकीय सेवेत नोकरीसुद्धा लावून दिलीय. कोरोनाचे संकट येण्यापूर्वी ते जवळपास तिनशे विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने शिकवायचे. लॉकडाउन त्यांचे क्लासेस बंद पडले. मग कराळे गुरुजींनी शक्कल लढवत ऑनलाईन क्लास सुरू केले. सुरवातीला गुगल मिट व झूम अँपच्या माध्यमातून शिकवण्याचा प्रयत्न केला. पण तिथंही अडचणी आल्यानं त्यांनी यु ट्युबवर व्हिडीओ अपलोड केले.

हळूहळू त्यांच्या व्हिडिओला लोक पसंत करू लागले, मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक वाढू लागले. वऱ्हाडी भाषा आवडल्याने मुंबईतील दोन अनोळखी विद्यार्थ्यांनी मिम्स तयार करून सर्वत्र व्हायरल केले. व्हिडिओ व्हायरल होताच कराळे यांच्या वऱ्हाडी भाषेची सर्वत्र चर्चा सुरू झाली. त्यांचा खदखदणाऱ्या ज्वालामुखी शिकवितानाचा व्हिडिओ हिट ठरला.

कराळे यांच्या मते, शिक्षण रटाळवाणे असेल तर विद्यार्थ्यांच्या डोक्यावरून जाते. मात्र तेच बोलीभाषेत असेल तर मुलांच्या अनेक दिवसपर्यंत आठवणीत राहाते. त्यांच्या गावरान भाषेवर टीकाही होत आहे. त्याची त्यांना अजिबात पर्वा नाही. माझी जडणघडण वऱ्हाडी भाषेतून झाली असून, याच भाषेतून मी यापुढेही शिकविणार असल्याचे त्यांनी सांगितले. या शिक्षणाचा फायदा होत असल्यामुळे विद्यार्थीही खुश आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com