गरिबीच्या खाणीतून घेतला या शिक्षकाने अस्सल हिऱ्यांचा शोध.... 

मिलिंद उमरे 
Tuesday, 4 August 2020

सेवानिवृत्तीनंतर ज्ञानदानाचे कार्य करण्यासाठी त्यांनी "टाय' नावाने शिकवणी वर्ग सुरू केले. पण, येथे दहावीपर्यंत मोफत शिक्षण ठेवले. केवळ मोफत शिक्षणच दिले नाही,तर या मुलांवर मेहनत घेतली. त्यांच्यातील आत्मविश्‍वास जागृत करीत अभ्यासाची योग्य दिशा दिली.

गडचिरोली : गरीब कुटुंबात जन्म झाला म्हणून कुणाचे आंतरिक गुण कमी होत नाहीत. पण, त्यांना योग्य मार्गदर्शकाची गरज असते. येथील सेवानिवृत्त केंद्रप्रमुख वासुदेव बांबोळे यांनी अशाच मार्गदर्शकाची भूमिका पार पाडत गरिबीच्या खाणीतून दहावीच्या परीक्षेत देदिप्यमान यश मिळविणारे हिरे घडविले आहेत. 

सध्याच्या काळात महागड्या शाळा आणि महागडे कोचिंग क्‍लासेस याचेच मोठे पीक आले आहे. कुठेही पैशाशिवाय मार्गदर्शन मिळत नाही. अगदी नर्सरीपासून 25 हजारहून अधिक शुल्क घेणाऱ्या शाळा मागास म्हणविल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात आहेत. त्यामुळे गरिबांच्या मुलांना शिक्षणात अनेक अडचणी येतात. एकीकडे पटसंख्येअभावी जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडत आहेत, तर दुसरीकडे सर्वत्र बोकाळलेल्या कॉन्व्हेंट संस्कृतीने पैसे नसणाऱ्यांसाठी आपली दारे बंद करणे सुरू आहेत. अशा परिस्थितीत गरिबांच्या मुलांनी जायचे तरी कुठे असा प्रश्‍न निर्माण होत आहे. शिक्षण विभागातून केंद्र प्रमुख म्हणून सेवानिवृत्त वासुदेव बांबोळे यांनाही समाजातील ही व्यथा दिसली. 

अवश्य वाचा- चौघांना घरी जाण्याची ओढ... एकमेकांचे हात घट्ट पकडले, पाण्याचा मधोमध हाताची साखळी तुटली अन् घडली दुर्दैवी घटना...

सेवानिवृत्तीनंतर ज्ञानदानाचे कार्य करण्यासाठी त्यांनी "टाय' नावाने शिकवणी वर्ग सुरू केले. पण, येथे दहावीपर्यंत मोफत शिक्षण ठेवले. केवळ मोफत शिक्षणच दिले नाही,तर या मुलांवर मेहनत घेतली. त्यांच्यातील आत्मविश्‍वास जागृत करीत अभ्यासाची योग्य दिशा दिली. या कार्यात त्यांचे पुत्र शिरीष बांबोळे यांनीही सहकार्य केले. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनातून घडलेल्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत गुणांची लयलूट केली आहे. त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणारा अखिलेश समर्थ याने 94.40 टक्‍के, गेतेश कापकर 93.20, पूजा शेंडे 92.40, पायल कुळमेथे 90.40, सावन नागरे 88.40, आसावरी नखाते 87.80, नंदिनी निर्गुनवार 85.40, स्नेहल पोहरकर 83.80, सेजल मेश्राम 82.40, चाहत भांडेकर 81.80, वैष्णवी पिपरे 80.80, भूमिका पिठाले हिने 79.20 टक्‍के गुण प्राप्त केले आहेत. 

GoodNews : कोव्हॅक्‍सिन लसीचा दुसरा डोस १० ऑगस्टला; पहिला प्रयोग यशस्वी होण्याचा विश्वास

पैशांचा केला पराभव.... 

सध्या शिक्षण आणि पैसा हेच समीकरण झाले आहे. भव्य इमारती उभारून, अत्याधुनिक सुविधा निर्माण करून मग मोठे शुल्क आकारणाऱ्या शाळा स्वत:ला नेहमी प्रसिद्धीच्या झोतात ठेवतात. अशा शाळा, महागडे कोचिंग क्‍लासेस शिक्षणासाठी पैशाशिवाय पर्याय नाही, हाच संस्कार विद्यार्थ्यांच्या मनात नकळत रुजवत असतात. पण, या विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीने यश मिळवून शिक्षणातील पैशांचा पराभव केला आहे. 
 

संपादन ः राजेंद्र मारोटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A teacher taught poor s.s.c. student without fee and students passed out Excellently