स्वावलंबनाचे धडे देण्यास शिक्षकांनी केली शेती,विद्यार्थ्यांना कृतीतून शिक्षण 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 July 2020

आनंदनिकेतन शाळेची शेती नेहमी विद्यार्थी आणि शिक्षकांच्या परिश्रमाने कसली जाते. शेती करताना त्याविषयीचे शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. हे कृतियुक्त शिक्षण विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात उपयोगी ठरते.

सेवाग्राम,(जि. वर्धा) : महात्मा गांधी यांच्या स्वावलंबन आणि व्यवसायाभिमुख शिक्षण पद्धतीवर आधारित असलेल्या आश्रम परिसरातील आनंदनिकेतन विद्यालयात शिक्षकांनी शेतीची मशागत करून बियाण्यांची लागवड केली. आता आंतरमशागतीचे काम सुरू आहे. कृतीतून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा हा उपक्रम आगळावेगळा ठरत आहे. 

आनंदनिकेतन शाळेची शेती नेहमी विद्यार्थी आणि शिक्षकांच्या परिश्रमाने कसली जाते. शेती करताना त्याविषयीचे शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. हे कृतियुक्त शिक्षण विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात उपयोगी ठरते. यावर्षी जून महिन्यात कोरोना संक्रमणामुळे राज्यातील सर्व शाळा- महाविद्यालये बंद आहेत.

राज्य सरकार एक-दोन महिन्यांत शाळा-महाविद्यालये सुरू करण्याच्या तयारीत आहे. मात्र, या बंदच्या काळात शेती पडीक राहील आणि जेव्हा शाळा सुरू होईल, तेव्हा विद्यार्थ्यांना भाजीपाला, कडधान्य भोजनात मिळणार नाही, याची दखल घेत शेतीत लागवड करण्यात आली. या कामात शेती विभागाचे शिक्षक शंकर भोयर, पंडित चनोळे हे सहकार्य करीत आहेत. 

सेवाग्राम आश्रम परिसरातील नई तालीम समितीअंतर्गत आनंदनिकेतन विद्यालयाजवळील साडेतीन एकर शेतीची मशागत करण्यात आली. या शेतात कपाशी, तूर, मका ,भेंडी, चवळा, पालेभाज्यावर्गीय पिकांची लागवड आदी करण्यात आली. या शेतातील पिकांच्या उत्पन्नातून आनंदनिकेतन विद्यालयातील विद्यार्थ्यांवर खर्च केला जातो. येथे पहिली ते दहावीपर्यंत वर्ग असून, 25 शिक्षकांची चमू शेतीच्या कामात मग्न आहे. या माध्यमातून बापू कुटी परिसरात आगळ्यावेगळ्या प्रयोगाचे दर्शन घडत आहे. 

नई तालीमकडून मास्कनिर्मिती 

शिक्षक सध्या शेतीच्या काम मग्न असले तरी महिलावर्ग खादीच्या कापडापासून विद्यार्थ्यांकरिता मास्क बनविण्याचे काम करीत आहेत. कोरोनामुळे सध्या शाळा बंद असल्या तरी जेव्हा सुरू होतील तेव्हा विद्यार्थ्यांना मास्क वापरण्याकरिता उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे. मास्क बाजारातून विकत न घेता खादीच्या कापडापासून बनविले जात आहे. 

मन, मनगट आणि बुद्धीला चालना देणाऱ्या शिक्षण पद्धतीनुसार येथे शिकविले जाते. यातून विद्यार्थी घडविण्याचे काम सुरू आहे. लॉकडाउनमुळे शाळा बंद आहे. मात्र, जेव्हा शाळा सुरू होईल तेव्हा विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, याची काळजी घेतली जात आहे. गांधी विचारांच्या आधारे आमच्या शाळेत शिक्षण दिले जाते. 
सुषमा शर्मा, मुख्याध्यापक, आनंदनिकेतन विद्यालय, सेवाग्राम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teachers did farming to teach self-reliance lessons