मानवी तस्करी प्रकरण : विशेष पथक हरिणायाकडे रवाना

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 जानेवारी 2020

पोलिसांनी सापळा रचून सहा जणांना नऊ जानेवारीला ताब्यात घेतले. चौकशीत जिजाबाई शिंदे हिने सात मुलींचा सौदा केल्याचे समोर आले. या मुली दिल्ली, उत्तरप्रदेश, हरियाना, हिमाचल प्रदेशात पाठविण्यात आल्या आहे. पोलिस आता त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेत आहे. हरिणायातील सहा जणांची पोलिसांनी तब्बल तीन दिवस चौकशी केली. मात्र पिडीतेच्या कुटुंबीयांनी तक्रार देण्यास नकार दिला.

चंद्रपूर : चंद्रपुरातील अल्पवयीन मुलीला हरियानात विकण्याचे प्रकरण तब्बल दहा वर्षानंतर उघडकीस आल्यानंतर याप्रकरणात आतापर्यंत चंद्रपुरातील चार महिलांना अटक करण्यात आली. या मानवी तस्करीच्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी स्थापन केलेले चंद्रपूर पोलिसांचे विशेष पथक आज (ता.11) हरिणायाकडे रवाना झाले.

याप्रकरणातील जवळपास 15 आरोपी हरिणायातील विविध जिल्ह्यात असल्याची माहिती आहे. ते हाती लागल्यास मानवी तस्करीची श्रृंखलाच पोलिसांच्या हाती लागण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

हेही वाचा - चुलत भावांचा वाद गेला विकोपाला, नंतर घडले असे...

पोलिस कोठडीतील आरोपींनी आतापर्यंत वीसच्या वर मुली लग्नाच्या नावावर विकण्याची कबुली दिली आहे. पिडीतेला पोलिसांनी दोन जानेवारीला चंद्रपुरात आणले. त्यानंतर तिला विकणाऱ्या जान्हवी मुजूमदार आणि सावित्री रॉय या दोन महिलेला सहा जानेवारीला पोलिसांनी अटक केली. या दोघींनी गीता मुजूमदार ही सुद्धा मुलींना दुसऱ्या राज्यात लग्नाच्या नावावर पाठविते असे सांगितले.

हेही वाचा - 'हास्य क्‍लब'मध्ये हास्याचे कारंजे
 

गीताला आठ जानेवारीला पोलिसांनी अटक केली. गीताने दिलेल्या माहितीनुसार जिजाबाई शिंदे हिला पोलिसांनी ताब्यात घेतले. मध्यप्रदेशातील उज्जैन येथील सहा जण क्रिष्णनगर परिसरातील एका गरीब कुटुंबातील मुलीला न्यायला येणार आहे, अशी पोलिसांना गीताने माहिती दिली. त्यात जिबाबाईची मध्यस्थी होती, अशी "टीप'तिच्याकडून पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी सापळा रचून सहा जणांना नऊ जानेवारीला ताब्यात घेतले. चौकशीत जिजाबाई शिंदे हिने सात मुलींचा सौदा केल्याचे समोर आले. या मुली दिल्ली, उत्तरप्रदेश, हरियाना, हिमाचल प्रदेशात पाठविण्यात आल्या आहे. पोलिस आता त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेत आहे. हरिणायातील सहा जणांची पोलिसांनी तब्बल तीन दिवस चौकशी केली. मात्र पिडीतेच्या कुटुंबीयांनी तक्रार देण्यास नकार दिला. शेवटी पिडीतेने यातील दशरथ पाटीदार आणि राजेश प्रजापती (दोघेही मध्यप्रदेशातील) यांनी विनयंभगांचा प्रयत्न केल्याचे बयाण दिले. त्यासाठी जिजाबाईने मदत केली, असा आरोप तिने केला. त्यामुळे तूर्तास पोलिसांनी पाटीदार, प्रजापती आणि जिजाबाईवर भादंवी 354, 452 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दशरथ पाटीदार याने जिबाबाईशी मुली संदर्भात संपर्क साधला होता. त्यानंतर पाटीदार सहा जणांसह दीड लाख घेऊन मुलीच्या घरी पोहचला. मात्र तत्पूर्वीच पोलिस पोचले आणि पुढचा अनर्थ टळला.

दुसरीकडे अटकेतील चारही महिलांनी सांगितलेल्या मुलींच्या कुटुंबीयांशी पोलिस संपर्क साधत आहे. आता मुलगी नेमकी कुठे आहे, याची माहिती घेत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: team went to hariyana in human traficking case