ये तो हद हो गयी भई

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 जानेवारी 2020

काही महिन्यांपूर्वी दीड किलोमीटरचे डांबरीकरण पूर्ण केले. उर्वरित रस्त्याचे डांबरीकरण करीत असतानाच तेलंगणातील केरामेरी वनमंडळाचे अधिकारी यांनी रस्ता आमच्या हद्दीत आहे, असे सांगून काम बंद केले. त्यामुळे मागील सात दिवसांपासून रस्त्याचे काम बंद आहे.

जिवती (जि. चंद्रपूर) : जिवती तालुक्‍यातून तेलंगणा-आंध्र प्रदेशकडे जाणाऱ्या मुख्य मार्गाचे डांबरीकरण वनाधिकाऱ्यांनी थांबविल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. हा मार्ग आसिफाबाद, आदिलाबाद, हैदराबाद आणि मराठवाड्याकडे जातो. या मार्गाचे काम बऱ्याच वर्षापासून रखडले होते. काही महिन्यांपूर्वी दीड किलोमीटरचे डांबरीकरण पूर्ण केले. उर्वरित रस्त्याचे डांबरीकरण करीत असतानाच तेलंगणातील केरामेरी वनमंडळाचे अधिकारी यांनी रस्ता आमच्या हद्दीत आहे, असे सांगून काम बंद केले. त्यामुळे मागील सात दिवसांपासून रस्त्याचे काम बंद आहे.

सविस्तर वाचा - बाजारात वाढली महिलांची गर्दी , पण कशासाठी

चंद्रपूर जिल्हा परिषदेकडून रस्त्याचे डांबरीकरण केले जात होते. या संदर्भात तेलंगणा-महाराष्ट्राचा दावा असलेल्या 12 गावांतील नागरिकांनी दोन्ही राज्यातील लोकप्रतिनिधींना याची माहिती दिली. लवकरच हा प्रश्‍न मार्गी काढू, असे आश्‍वासन त्यांनी दिले होते. मागील चाळीस वर्षांपासून हा रस्ता रहदारीसाठी दोन्ही राज्यातील नागरिक वापरतात. यापूर्वी या रस्त्यावर खडीकरण केले आहे. मात्र डांबरीकरणाचे काम थांबविण्यात आले.
परवानगी घेणे आवश्‍यक
लेंडीगुडा गावाजवळ दीड किलोमीटर परिसराची हद्द तेलंगणात येते. त्यामुळे परवानगी घेऊनच काम करावे. परवानगी देण्यासाठी आम्ही तयार आहोत. अन्यथा काम करू देणार नाही.
रणजित नाईक, वनपरिक्षेत्राधिकारी, आसिफाबाद.
 

हा मार्ग महाराष्ट्राचा
नकाशानुसार हा मार्ग महाराष्ट्राच्या नकाशात आहे. त्यामुळे परवानगीचा प्रश्‍नच येत नाही.
योगिता मडावी, वनपरिक्षेत्राधिकारी, जिवती.

वादग्रस्त 12 गावे
महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील 12 गावांचा वाद अद्यापही सर्वोच्च न्यायालयात आहे. या गावांवर दोन्ही राज्यांनी दावा केला आहे. मात्र येथील बहुतांश नागरिक मराठी भाषिक आहेत. येथे अनुसूचित जाती आणि जमातीमधील नागरिकांना महाराष्ट्राच्या तुलनेत तेलंगणात अधिक सुविधा मिळतात. त्यामुळे त्यांचा कल तेलंगणाच्या बाजूने आहे. उर्वरित नागरिक महाराष्ट्रात राहायला तयार आहेत. या गावांमध्ये दोन्ही राज्यांच्या शाळा, ग्रामपंचायत, दोन सरपंच, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Telangana stoped road work of Maharashtra