भुलभुलैय्या नावाने ओळखले जाते पुरातन दत्त मंदिर

bhulbhullaya.
bhulbhullaya.

अचलपूर(जि. अमरावती) : विदर्भ प्रांताला पौराणिक इतिहास आहे. त्या प्राचीन इतिहासाची साक्ष देणा-या अनेक वास्तू इथे उभ्या आहेत. प्रत्येकाची कथा निराळी आणि वैषिष्ट्यपूर्ण. असेच पुरातन वास्तुकलेची साक्ष देत अचलपुरात एक मंदिर उभे आहे. ते भुलभुलैया मंदिर नावाने ओळखले जाते.                                          अचलपुरातील दत्तमंदिर भुलभुलैय्या या नावानेच ओळखले जाते. येथे दत्ताच्या मंदिरासह ११ देवीदेवतांची मंदिरे आहेत.  जवळपास १६८ वर्षांपूर्वीचे हे मंदिर अचलपूरच्या सुलतानपु-यात आहे. मात्र, या मंदिराचा इतिहास गुलदस्त्यातच आहे. या मंदिराच्या वैशिष्ट्यपूर्ण बांधकामाविषयीची शास्त्रीय माहितीही उपलब्ध नाही.
या मंदिराच्या प्रत्येक खोलीत सूर्यप्रकाश पडतो. नावाप्रमाणेच मंदिराच्या आत जाताना भुलभुलैयात गेल्यासारखे वाटते. त्यामुळे या वास्तूत  एकट्याने प्रवेश करण्यास  भिती वाटते.
अचलपूरमधील ऐतिहासिक वास्तू म्हणून ओळखल्या जाणा-या दत्तमंदिर (भुलभुलैय्या) या वास्तूची पडझड परिसरातील नागरिकांच्या सहकार्यामुळे थोडी का होईना थांबली. परंतु पुरातत्त्व विभागाचे या मंदिराकडे पूर्ण दुर्लक्ष आहे. या ऐतिहासिक वास्तूची सुरक्षा महत्त्वाची आहे. परंतु पडझडीमुळे भुलभुलैय्या या वास्तूच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
अचलपूर शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. याठिकाणी अनेक ऐतिहासिक वास्तू उभ्या आहेत. मात्र यापैकी बहुतांश वास्तू अखेरच्या घटका मोजत आहेत. त्यापैकीच एक वास्तू दत्तमंदिर ( भुलभुलैय्या) आहे. नावाप्रमाणेच ही वास्तू आहे. पूर्वी हे मंदिर चकाभुली मंदिर या नावाने ओळखले जायचे. कालांतराने या वास्तूला भुलभुलैय्या हे नाव पडले. १९९९ मध्येच ही वास्तू अत्यंत  जीर्ण झाली होती. कित्येक वर्षांपासून या वास्तूची दुरुस्ती न केल्यामुळे या ऐतिहासिक वास्तूची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. मात्र परिसरातील नागरिकांनी पुढाकार घेऊन या वास्तूची डागडुजी केली.
जवळपास १६८ वर्षांपूर्वीचे हे मंदिर अचलपूरच्या सुलतानपु-यात उभे आहे. या दोन मजली  इमारतीत प्रवेश घेताना आधी मुख्य मंदिर दत्ताचे. त्यानंतर खाली भुयारात पुरातन शिवलिंग आहे. तेथून पुढे ज्ञानेश्वर, विष्णू दरबार, अन्नपूर्णा, रामदरबार, रिद्धी-सिद्धीसह गणपती व अन्य मंदिरे आहेत. अशा या पुरातन मंदिरात प्रवेश घेतल्यानंतर आतल्या आतच भक्त फिरत राहतो. आता आपण भुललो, बाहेर कसे पडायचे, या विचाराने तो वाट शोधतो. रस्ता लक्षात येत नाही. म्हणून या श्रीदत्तमंदिराला भुलभुलैय्या म्हटले गेले.

सविस्तर वाचा - ...तर सप्टेंबरमध्ये होऊ शकते नव्या सत्राची सुरुवात
या वास्तूत असलेल्या प्रत्येक मंदिराच्या खोलीत सूर्यप्रकाश पोहोचत असल्याने अतिशय कल्पक पद्धतीने या मंदिराची रचना करण्यात आली आहे असे लक्षात येते. या मंदिराची अशा पद्धतीने रचना का करण्यात आली, हे रहस्य मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. मंदिराच्या इतिहासाची कोणतीही माहिती याठिकाणी उपलब्ध नाही. जो तो आपल्या पद्धतीने तर्क लावून या मंदिराचा इतिहास सांगत असतो. वास्तूची होणारी पडझड परिसरातील किशोर गेरंज यांनी पुढाकार घेत व नागरिकांच्या सहकार्याने थांबवली असल्याने ही ऐतिहासिक वास्तू आजसुद्धा दिमाखात उभी आहे. मात्र, तिथे येणा-या भक्तांची  संख्या नगण्य आहे.
-----------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com