कोरोनाच्या सावटामुळे आषाढी एकादशीला आटला भक्‍तांचा पूर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील मंदिरांना परवानगी देण्यात आलेली नाही. शहरातील अंबादेवी, एकवीरा मातेचे मंदिरासह सर्व मंदिरे लॉकडाउनपासूनच बंद आहेत. आषाढी एकादशीवर सुद्धा कोरोनाचे सावट आहे. विशेष म्हणजे एकादशीनिमित्त भाविकांना उसळ तसेच फराळी साहित्याची सुद्धा यंदा व्यवस्था राहणार नाही.

अमरावती :यंदाची एकादशी खूप निराळी आहे. खरेतर विठ्ठल हे महाराष्ट्राचे कुलदैवत. दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने अवघा महाराष्ट्र पावसाच्या सरीसह भक्‍तीरंगात न्हाऊन निघतो. यंदा मात्र कोरोनाच्या सावटामुळे शासनाकडून खबरदारी म्हणून मंदिरांची टाळेबंदी कायम ठेवण्यात आली आहे. प्रत्यक्ष पंढरपुरातही वारीवर बंदी आहे. त्या अनुषंगाने बुधवारी (ता.1) कोरोनाच्या सावटात आषाढी एकादशी साजरी होत आहे. भाविक तसेच विठ्ठल भक्तांमध्ये एकादशीचा उत्साह दिसून येत असला तरी प्रत्यक्षात जवळपास सर्वच विठ्ठल मंदिरांमध्ये मुखदर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील मंदिरांना परवानगी देण्यात आलेली नाही. शहरातील अंबादेवी, एकवीरा मातेचे मंदिरासह सर्व मंदिरे लॉकडाउनपासूनच बंद आहेत. आषाढी एकादशीवर सुद्धा कोरोनाचे सावट आहे. विशेष म्हणजे एकादशीनिमित्त भाविकांना उसळ तसेच फराळी साहित्याची सुद्धा यंदा व्यवस्था राहणार नाही.

या संदर्भात महालक्ष्मीनगर येथील माउली विठ्ठल रुक्‍मिणी ट्रस्टचे नारायण कावरे यांनी सांगितले, एकादशीला भाविक केवळ मुखदर्शन घेऊ शकतील. गाभाऱ्यात कुणालाही प्रवेश नसेल. कुणीही अगरबत्ती, कापूर, हळद आणू नये तसेच आपापल्या घरून प्रसाद आणावा व बाहेरूनच पाणी फेरून देवाला दाखवून आपल्याच परिवारात त्याचे वाटप करावे. शेंगदाणे, साबुदाणे तसेच इतर साहित्य मंदिरात आणू नये, असे आवाहन त्यांनी केले. याशिवाय कोणत्याही प्रकारची वर्गणी, देणगी स्वीकारली जाणार नाही, असेही नारायण कावरे यांनी सांगितले.

शहरातील अंबागेट, कॅम्प परिसर, शारदानगर, महालक्ष्मीनगर, प्रभात कॉलनी यांसह अन्य भागामध्ये विठ्ठल मंदिरे आहेत, मात्र शासनाचा आदेश असल्याने ही मंदिरे बंदच राहतील. त्यामुळे भाविकांना दुरूनच आपल्या लाडक्‍या दैवताचे दर्शन घ्यावे लागणार आहे. याशिवाय यंदा मंदिराच्या परिसरातील फराळी साहित्याचे वाटप पूर्णपणे बंदच राहणार आहे.

सविस्तर वाचा - बेटा शिवसेना का पॉवर हैं.. अख्खा फॅमिली को उडा दूंगा

फराळाची पार्सल सुविधा
एकादशीच्या दिवशी खरे तर फराळाच्या पदार्थांची रेलचेल असते. खाद्यपदार्थांच्या दुकानांमध्ये उपवासाचे पदार्थ असतात. यंदा मात्र शहरातील काही ठिकाणीच फराळी साहित्याची पार्सल सुविधा उपलब्ध राहणार आहे. त्यासाठी व्यावसायिकांकडून सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन आदी व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Temples are closed on Aashadhi Ekadashi due to corona