esakal | मला माझी आई हवी आहे...दहा वर्षाच्या मुलाचा आईसाठी टाहो!
sakal

बोलून बातमी शोधा

boy mother

आईवडिलांच्या आठवणीने तो दिवसरात्र रडत असतो. जशी संकेतची अवस्था तशीच त्याच्या आईचीही. मायलेक दोघेही एकमेकांना बघण्यासाठी आतुर आहेत. पण लॉकडाऊमुळे दोघेही एकमेकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. संकेत व कविता या मायलेकांच्या करूण कहाणीने समाजमन हेलावले आहे.

मला माझी आई हवी आहे...दहा वर्षाच्या मुलाचा आईसाठी टाहो!

sakal_logo
By
संदीप रायपुरे

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : संपूर्ण जग कोरोनाच्या धास्तीने आपापल्या घरी आहे. अशात एका चिमुकल्याच्या वाट्याला आलेल्या वेदना समाजमनालाही अस्वस्थ करीत आहेत. त्याचे नाव संकेत रूपेश रामटेके. चवथीत शिकणारा दहा-अकरा वर्षांचा मुलगा. मौजमस्ती करायची अन्‌ आपल्याच विश्वात मनसोक्त रमायचे. पण हल्ली तो खूपच रडतो. पंधरा दिवसांपूर्वी त्याचे बाबा वारले. अन्‌ आई दूर परप्रांतात महिनाभरापासून अडकली आहे.
तीही प्रचंड अस्वस्थ आहे. मायलेकांची ही अगतिकता व्याकूळ करणारी आहे. मला माझ्या मुलाकडे घेऊन चला हो, तो सारखा रडतो असा आर्त टाहो तिने फोडला. आजारी पती व मुलाच्या पालनपोषणासाठी मूल तालुक्‍यातील बोरचांदली येथील कविता रामटेके तेलंगणातील खम्मम जिल्ह्यातील भजातांडा येथे मिरची तोडणीच्या कामाला गेली. अशात कोरोनाचे सावट आले. लॉकडाऊनमुळे हजारो मजुरांप्रमाणे तीही अडकली. लॉकडाऊन सुरू असतानाच 1 एप्रिल रोजी पतीच्या निधनाची धक्कादायक बातमी तिला परप्रांतात कळली; मात्र  लॉकडाउनमुळे ती अंत्यसंस्कारालाही येऊ शकली नाही.
कविता यांना संकेत नावाचा एकुलता एक मुलगा आहे. तो चवथ्या वर्गात शिकतो. हसण्याखेळण्याच्या  या कोवळ्या वयात त्याच्यावर आलेले संकट न बघविणारे आहे. पंधरा दिवसांपूर्वी वडील रूपेश कायमचे गेले. मिरची तोडणीसाठी तेलंगणात गेलेली आई लॉकडाऊनमुळे अडकली आहे.  सध्या तो आपल्या मामाकडे आजीसह राहतो. पण आईवडिलांच्या आठवणीने तो दिवसरात्र रडत असतो. जशी संकेतची अवस्था तशीच त्याच्या आईचीही. मायलेक दोघेही एकमेकांना बघण्यासाठी आतुर आहेत. पण लॉकडाऊमुळे दोघेही एकमेकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. संकेत व कविता या मायलेकांच्या करूण कहाणीने समाजमन हेलावले आहे.

सविस्तर वाचा - कोरोना पाठोपाठ विदर्भात या आजारानेही काढले डोके वर; मेडिकलमध्ये एकाचा बळी
मला माझ्या मुलाकडे नेऊन द्या हो,                                                      सकाळी उठल्यापासून तो आपल्या आजी व मामाला आई कधी येणार, हेच वारंवार विचारतो. अन मग रडायला लागतो. त्याच्या प्रश्नाने इतरांच्याही डोळ्यात पाणी उभे राहते. आज चंद्रपुरातील काही कार्यकर्ते कविताशी बोलले. यावेळी तिने आपल्या व्यथा मांडल्या. मला माझ्या मुलाकडे नेऊन द्या हो, असा आर्त टाहो कविताने फोडला. कोरानाने एका चिमुकल्याला व त्याच्या आईला दिलेल्या या वेदना कधीही न विसरल्या जाणार्या आहेत. रोजीरोटीसाठी परप्रांतांत जाण्याची एवढी मोठी किंमत चुकवावी लागेल, असा विचार तिने स्वप्नातदेखील केला नसेल. कोरानाच्या संकटकाळात मायलेकांच्या वेदनेने  समाजमन हळहळत आहे.

loading image