थडीपवनी परिसरात वाघाची दहशत; शेतकरी, मजुरांची कामावर जाण्यास टाळाटाळ 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

गोठ्यात चार वासरांचा फडशा पाडल्याने वनविभागालही वाघाचा वावर मान्य करावा लागला. दरम्यान, यामुळे चांगलीच खळबळ माजली.

थडीपवनी, (जि. नागपूर) : जिल्ह्याच्या विविध भागात वाघाची चांगलीच दहशत पसरली आहे. पारशिवनी, मौदा तालुक्‍यासह नरखेड तालुक्‍यातही वाघ जनावरांची शिकार केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. नरखेड तालुक्‍यातील थडीपवनी परिसरातील गावांमध्ये वाघाने दोन जनावरांची शिकार केल्याचे समोर आले आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. 

वाघ जामगाव, लोहारी सावंगा, वाढोणा, बानूर या परिसरात मुक्काम आहे. मागील वर्षी याच परिसरात वाघाचा एक महिना मुक्काम होता. वाघ दिसल्याच्या ग्रामस्थ सांगत असताना वनाधिकारी त्यावर विश्‍वास ठेवण्यास तयार नव्हते. मात्र, थडीपवनी येथील राजेश वासुदेव मातकर यांच्या शेतातील गोठ्यात चार वासरांचा फडशा पाडल्याने वनविभागालही वाघाचा वावर मान्य करावा लागला. दरम्यान, यामुळे चांगलीच खळबळ माजली.

तीन गायी वाघाने फस्त केल्या 

रात्री जागलीला जाणारे शेतकरी व दिवसा कामावर जाणारे शेतमजूर चांगलेच दहशतीत आले. 
थडीपवनीचे विठ्ठल पांडुरंग चौधरी यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेल्या तीन गायी वाघाने फस्त केल्याचे समोर आले आहे. शनिवारी त्यांना तीन वर्षांच्या कालवडीवर वाघाने हल्ला केल्याचे दिसून आले. यासोबतच चार वर्षांची कालवड छिन्नविच्छिन्न अवस्थेत दिसून आली.

हिंस्त्रप्राण्याचा बंदोबस्त करावा

चौधरी यांनी या घटनेची माहिती वनविभागाला दिली असून वनरक्षक चव्हाण यांनी पंचनामा केला. मात्र, त्यांनी हे काम वाघाचे नसल्याचे मत व्यक्त केल्यानेही अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. नागरिकांनी वाघाला किंवा इतर हिंस्त्रप्राण्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Terror of tigers in Thadipavani area