हिंगणघाट जळीतकांड प्रकरण : सुनावणी संपली पहिल्या सत्रातच; उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांसह दोघांची साक्ष

रूपेश खैरी
Wednesday, 17 February 2021

अंकिताची सहप्राध्यापिका मोनिका माऊस्कर आणि या घटनेची माहिती प्रथम मातोश्री कुणावार महाविद्यालयात देणारी विद्यार्थिनी वैष्णवी चंदनखेडे हिची साक्ष नोंदविण्यात आली.

हिंगणघाट (जि. वर्धा) : अंकिता पिसुड्डे जळीतकांड प्रकरणात मंगळवारी (ता. १६) तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरसह अन्य दोघांची साक्ष नोंदविण्यात आली. बचाव पक्षाच्या वतीने त्यांची उलटतपासणीही करण्यात आली. त्यांनी या साक्षीदारांना विशेष विचारणा केली नसल्याने आजचे कामकाज दुपारच्याच सत्रात आटोपले.

अंकिता पिसुड्डे जळीतकांड प्रकरणाचे कामकाज येथील न्यायालयात सकाळी ११ वाजता जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन. माजगावकर यांच्या समोर सुरू झाले. सरकारी पक्षातर्फे अंकितावर नागपूर येथे उपचार करणारे डॉ. निनाद गावंडे यांची साक्ष नोंदविण्यात आली. सोबतच अंकिताची सहप्राध्यापिका मोनिका माऊस्कर आणि या घटनेची माहिती प्रथम मातोश्री कुणावार महाविद्यालयात देणारी विद्यार्थिनी वैष्णवी चंदनखेडे हिची साक्ष नोंदविण्यात आली.

तिघांचीही बचाव पक्षाच्या वकिलांनी उलटतपासणी केली. यावेळी त्यांनी विशेष विचारणा केली नसल्याने आजची सुनावणी पहिल्या सत्रातच संपली. सरकारी पक्षातर्फे या प्रकरणात झालेल्या तीन साक्षीदार शिवाय मागील तारखांना प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सागर गायकवाड तसेच अभय तळवेकर, मृत अंकिताचे वडील अरुण नागोराव पिसुड्डे, आई संगीता, शव परीक्षण पंचनाम्याच्या पंच साक्षीदार नागपूरच्या श्रीमती देशमुख, मातोश्री कॉलेजचे प्राचार्य डॉ. उमेश तुळसकर, घटनास्थळावरील पंच सचिन बुटले अशा एकूण आठ जणांची साक्ष नोंदविण्यात आलेली आहे.

अधिक वाचा - लग्नासाठी वर-वधू होते तयार; मंगलाष्टक सुरू असतानाच झाले सर्वकाही शांत; वधूपक्षावर ओढवली नामुष्की

शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्‍टरांची साक्ष

खटल्यात सरकारी पक्षातर्फे बुधवारी (ता. १७) अंकिताचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्‍टरांची साक्ष नोंदविण्यात येणार आहे. या प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने एकूण ७७ साक्षीदार आहेत. सरकारी पक्षातर्फे प्रसिद्ध विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी भाग घेतला. त्यांना सरकारी वकील ॲड. वैद्य यांनी सहकार्य केले; तर बचाव पक्षातर्फे भूपेंद्र सोने यांनी भाग घेतला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Testimony of both including the treating doctor Hinganghat arson case