Gonida : ब्लू-टूथ लावून सोडविला टीईटीचा पेपर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tet exam

ब्लू-टूथ लावून सोडविला टीईटीचा पेपर

गोंदिया : टी. बी. टोली गोंदिया येथील संत तुकाराम हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थिनीने चक्क ब्लू-टूथ कानाला लावून टीईटीचा पेपर सोडविल्याचे समोर आले आहे. हा प्रकार खुद्द परीक्षार्थी विद्यार्थिनीनेच उजेडात आणला. आता त्या हायटेक काॅपी करणाऱ्या विद्यार्थिनीवर काय कारवाई होते, याकडे लक्ष लागून आहे.

टीईटी अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आज, रविवारी राज्यभरात घेण्यात आली. गोंदियातही या परीक्षेला बहुतांश विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. मात्र, संत तुकाराम हायस्कूलच्या केंद्रात घडलेल्या या प्रकाराने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या केंद्रातील खोली क्रमांक पाचमध्ये एका विद्यार्थिनीने ब्लू-टूथ कानाला लावून पेपर सोडविला. सकाळी १०.३० ते दुपारी एकपर्यंत ही परीक्षा घेण्यात आली. संबंधित विद्यार्थिनी समोरच्या बाकावर होती. पेपरची वेळ पूर्ण होईपर्यंत हा प्रकार लक्षात आला नाही. नंतर मात्र, एका परीक्षार्थी विद्यार्थिनीला तिच्या कानाला ब्लू-टूथ लावल्याचे निदर्शनास येताच तिने या प्रकाराची तक्रार संबंधित मुख्याध्यापकाकडे केली. मुख्याध्यापकाने ब्लू-टूथ जप्त करीत संबंधित विद्यार्थिनीला परीक्षेपासून निलंबित करण्याची कारवाई केली जाईल, असे सांगितले. मात्र, उशिरापर्यंत कारवाई सुरूच होती. पीडित विद्यार्थिनीने ब्लू-टूथ जवळ बाळगला, मात्र वापर केला नसल्याचे सांगितल्याचे तक्रारकर्त्या विद्यार्थिनीने 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

ही उपकरणे आत गेलीच कशी

परीक्षा केंद्रात मोबाईल, ब्लू-टूथ व अन्य इलेक्ट्रीक उपकरणे नेण्याची परवानगी नसते. मग या विद्यार्थिनीजवळ ब्लू-टूथ आलाच कसा, परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांची तपासणी झाली किंवा नाही, हा प्रश्न कायम आहे. या प्रकाराची मात्र चांगलीच चर्चा आहे.

loading image
go to top