मानवरुपी परमेश्वरामुळेच बरा झालो; डॉक्‍टरांप्रती केली त्यांनी कृतज्ञता व्यक्त 

Doctors Team
Doctors Team
Updated on

यवतमाळ : कृषी क्षेत्राशी संबंधित व्यावसायिक असल्यामुळे शहरापासून गावखेड्यापर्यंतच्या नागरिकांशी नियमित संपर्क येतो. व्यवसायाच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी फिरणे आलेच. त्यामुळे एलर्जी व खोकल्याचा त्रास सुरवातीपासूनच होता. पण त्यात कोरोनाचा संसर्ग झाल्याचे कळताच मनात थोडी धास्ती वाटली. मात्र, यातून आपण लवकरच बरे होऊ, असा ठाम विश्वास होता. डॉक्‍टरांनी प्रत्येक क्षणी आमच्यासाठी घेतलेली मेहनत "न भुतो न भविष्यती' अनुभवायला मिळाली. या मानवरुपी परमेश्वरामुळेच आम्ही बरे झालो, अशी कृतज्ञता कोरोनावर मात करणाऱ्या व्यक्तीने व्यक्त केली आहे. आतापर्यंत 32 जणांनी कोरोनावर मात केल्याने यवतमाळकरांना दिलासा मिळाला आहे. 

जिल्ह्यात सुरवातीला तीनजण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. त्यात मी आणि माझी पत्नी होती. आम्हाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. तिघांसाठीही वेगवेगळी खोली, वेगवेगळे संडास-बाथरूम, सर्वत्र स्वच्छता. अशी नियोजनबद्घ कार्यपद्घती तर मोठमोठ्या खासगी दवाखान्यातसुद्घा अनुभवायला मिळत नाही. जे आम्ही यवतमाळ शहरातील वैद्यकीय महाविद्यालयात अनुभवले. आम्ही तर पॉझिटिव्ह रुग्ण होतो. पण येथील डॉक्‍टर्स, नर्स व त्यांच्या संपूर्ण स्टाफने अतिशय काळजीपूर्वक व आपुलकीने आमच्यावर उपचार केले. इतरत्र ऐकून होतो की, अशा पेशंटजवळ कोणी येत नाही. पण तत्कालीन अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे किट परिधान करून आमच्या खोलीमध्ये येऊन आस्थेने विचारपूस करीत होते. एवढेच नाही तर आम्हाला घरचे जेवण घेण्याची मुभा होती. 

घरून टिफीन आला की नाही, वेळेवर जेवले की नाही, अशा कितीतरी बाबींची डॉक्‍टरांकडून विचारणा होत होती. त्यांनी केलेल्या उपचारपद्घतीमुळे पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे प्रवास सुकर झाला. दुसरा आणि तिसरा नमुना निगेटिव्ह आल्यावर आम्हाला घरी सोडण्यात आले. तेव्हापासून घराचा उंबरठा आम्ही ओलांडला नाही, असेही निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्या व्यक्तीने स्पष्ट केले. प्रशासनाच्या या धडपडीत पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, विद्यमान अधिष्ठाता डॉ. आर. पी. सिंह, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण तसेच सर्व डॉक्‍टर्स, नर्स व इतर स्टाफ असे प्रत्येकाचेच योगदान आहे. 


पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांचे पहिल्या दिवसापासूनच मनोबल वाढविण्यासाठी समुपदेशन करण्यात आले. ड्युटीच्या शिफ्टनुसार 24 तास त्यांच्यावर लक्ष देण्यात आले. ज्या पदार्थांमध्ये "व्हिटॅमीन सी' जास्त आहे, असे पदार्थ, प्रोटीन जास्त असलेले पदार्थ, बादाम, अंजीर, दोन अंडी, संत्री आदी आहार या रुग्णांना वैद्यकीय महाविद्यालयाकडून देण्यात आला. सर्वांच्या परिश्रमाचे हे फळ आहे. 
- डॉ. मिलिंद कांबळे 
कोरोना समन्वययक, वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com