
बुलडाणा : खामगावचा दौरा आटोपून संतनगरी शेगावकडे (Santnagari Shegaon) निघालो. नव्यानेच झालेल्या रस्त्यावर गाडी धावू लागली. शेगाव शहराची हद्द लागताच नवोदय विद्यालय, संत गजनन महाराज इंजिनिअरिंग महाविद्यालय (Sant Gajanan Maharaj College of Engineering) दृष्टीस पडले. बसस्थानकावर ‘सकाळ’चे शेगाव तालुका बातमीदार संजय सोनोने व शेगावचे शहर बातमीदार दिनेश महाजन यांनी `रिसिव्ह` केले. सर्वप्रथम मंदिराकडे जाऊन श्रींचे दूरूनच दर्शन घेतले. सेवाभाव आणि समर्पणाचे धनी असलेले कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील (Shivshankarbhau Patil) यांच्या भेटीची मनस्वी इच्छा होती. मंदिर व्यवस्थापनेसोबतच आध्यात्मिकता, सामाजिकता यांचे उत्तम व्यवस्थापन करण्यासाठी जगात त्यांच्या नावाला तोड नाही. परंतु कोरोनामुळे इच्छेला आवर घातला. त्यानंतर शेगावच्या प्रसिद्ध शेगाव कचोरीवर (Shegaon Kachori) ताव मारला आणि निघालो शेगावकरांशी विकास आराखड्याबाबत चर्चा करायला. (The government got a vision for the Shegaon Industry Development Plan)
शेगाव मंदिर व आनंदसागर परिसर सोडला तर हे शेगाव आहे की एखादे मागासलेले शहर, असा प्रश्न येथे येणाऱ्या भाविकांना पडल्याशिवाय राहत नाही. संतनगरी असल्याने येथील व्यवसाय व उलाढाल मंदिराच्या भरोशावर अवलंबून आहे. दुसरा कोणताही मोठा उद्योग, प्रकल्प नाही. त्यामुळे शहरातील व्यावसायिक, तरुण यांना रोजगारासाठी इतर शहरात जाण्याशिवाय पर्याय नसतो. श्री संत गजानन महाराजांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या शेगावात महाराजांच्या दर्शनासाठी राज्यासह देश-विदेशातील लाखो भाविक येतात. संतनगरी अशीच शेगावची ओळख आहे.
भक्तीचे चैतन्य फुलविणारे हे गाव ‘आनंदसागर’ या मनोहारी आध्यात्मिक केंद्रामुळे धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून जगभरात ओळखले जाते. दररोज येणारे हजारो भाविक व उत्सवादरम्यान येणाऱ्या लाखो भक्तांमुळे शेगावात विकासकामांची नितांत आवश्यकता होती. परंतु आजही मंदिराच्या तुलनेत शहर विकासात प्रचंड मागे आहे. मंदिराकडे जाणारे अरुंद रस्ते मोठे झाले. त्यावर चकाकणारे पथदिवे लागले. सरकारी इमारती प्रशस्त झाल्या. परंतु विकासाच्या नावाने शहरात बोंबाबोंब आहे. विकास आराखड्याची कामे अतिशय संथगतीने झाल्याने नागरिकांना १० वर्षांनंतरही त्रास होत आहे.
शृंगगावचे झाले शेगाव
प्राचीन काळी शृंगमुनींनी वसविल्यामुळे शृंगगाव हे नाव पडलेल्या या गावास पुढे शेगाव म्हणून ओळखले जाऊ लागले. येथील प्रसिद्ध शिवमंदिरामुळे शिवगाव असेही म्हणत. या शिवगावाचे पुढे शेगाव असे नामकरण झाले. शेगावच्या निर्मितीबद्दल विविध मते असली तरी संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या पावन वास्तव्यामुळे शेगाव ओळखले जाते. महाराष्ट्राच्या बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव या गावात श्रींच्या पदस्पर्शाने तसेच त्यांच्या संजीवन वास्तव्यामुळे समृद्धीची गंगा, भावभक्तीची यमुना व ज्ञानरूपी सरस्वती सतत प्रवाहित आहे.
(The government got a vision for the Shegaon Industry Development Plan)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.