esakal | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नाला केंद्राचीच आडकाठी; ९४० घरकुलांचे बांधकाम रखडले
sakal

बोलून बातमी शोधा

There has been no funding for house building for five months

मनपा प्रशासनाने घरकुलासाठी निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. शासनाकडे निधी उपलब्ध होण्याचे पत्र धूळखात पडले आहे. त्यामुळे मागील पाच महिन्यांपासून निधी उपलब्ध झालेला नाही. त्याचा परिणाम ९४० घरकुलांचे बांधकाम रखडले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नाला केंद्राचीच आडकाठी; ९४० घरकुलांचे बांधकाम रखडले

sakal_logo
By
साईनाथ सोनटक्के

चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे. कुणीही बेघर असू नये. या उदात्त हेतूने प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली. ही त्यांची महत्त्वाकांक्षी योजना होती. मात्र, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नाला केंद्र सरकारचीच आडकाठी ठरत असल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे. केंद्र सरकारने या योजनेला मागील पाच महिन्यांपासून एक रुपयांचाही निधी दिला नाही. त्यामुळे एकट्या चंद्रपूर महानगरातील तब्बल ९४० घरकुलांचे बांधकाम रखडले आहेत.

केंद्र सरकारने २०१५ मध्ये प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली. या योजनेत केंद्र सरकार आणि राज्य शासन निधी उपलब्ध करून देणार आहे. दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना वैयक्तिक स्वरुपात घरकुलाचा लाभ देण्यात येणार आहे. शहरातील दुर्बल घटकातील कुटुंबांनी योजनेचा लाभ मिळावा म्हणून महानगरपालिका प्रशासनाकडे अर्ज सादर केले. त्यानंतर अर्जांची छाननी करण्यात आली. तीन टप्प्यात मागविण्यात आलेल्या एकूण अर्जांपैकी तब्बल एक हजार ५९ अर्ज मंजूर करण्यात आले. त्यामुळे अर्ज मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना आता हक्काचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार असे वाटत होते.

हेही वाचा - आता लायसन्ससाठी कुठेही जायची गरज नाही; घरबसल्या पुढील पद्धतीने काढा लर्निंग लायसन्स

महापालिकेकडे पहिल्या टप्प्याचा निधी उपलब्ध झाला. त्यानंतर लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात निधी वळता करण्यात आला. त्यामुळे ११९ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र, ज्या लाभार्थ्यांनी पहिला टप्प्याचा निधी प्राप्त झाल्यानंतर घरकुलाचे बांधकाम सुरू केले. आता दुसऱ्या टप्प्यातील निधीची प्रतीक्षा लाभार्थ्यांना आहे. परंतु, केंद्र सरकारकडून अजूनही पहिल्याच टप्प्यातील निधी उपलब्ध झालेला नाही. तर राज्य शासनाचा दुसरा टप्पा उपलब्ध होणे आवश्‍यक आहे.

मनपा प्रशासनाने घरकुलासाठी निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. शासनाकडे निधी उपलब्ध होण्याचे पत्र धूळखात पडले आहे. त्यामुळे मागील पाच महिन्यांपासून निधी उपलब्ध झालेला नाही. त्याचा परिणाम ९४० घरकुलांचे बांधकाम रखडले आहे. शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून देऊन घरकुलाचे स्वप्न साकारण्यास मदत करावी, अशी मागणी लाभार्थ्यांकडून केली जात आहे.

लाभार्थ्यांच्या येरझऱ्या

घरकुलाचा अर्ज मंजूर झाला. त्यानंतर घराचे बांधकाम सुरू केले. पहिल्या टप्प्यातील निधी प्राप्त झाला. मात्र, आता दुसऱ्या टप्प्यातील निधी अजूनही प्राप्त झालेला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांनी महापालिकेत येरझऱ्या टाकणे सुरू केले आहे. मनपा प्रशासनानेही शासनाकडे निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा केला आहे. मात्र, शासनस्तरावरूनच मागील पाच महिन्यांपासून निधी प्राप्त झालेला नाही. त्यामुळे संबंधित विभागात विचारणा केल्यानंतर निराश होऊन लाभार्थ्यांना परतावे लागत आहे.

ठळक बातमी - ‘ये लाईफ मैं डिझर्व्ह नही करता’, असे चिठ्ठीत लिहून पुण्यातील अभियंत्याची आत्महत्या

शासनाकडे पत्रव्यवहार सुरू
प्रधानमंत्री आवास योजनेचा निधी उपलब्ध व्हावा म्हणून शासनाकडे पत्रव्यवहार सुरू आहे. मात्र, मागील पाच महिन्यांपासून निधी प्राप्त झालेला नाही.
- विजय बोरीकर,
उपअभियंता, मनपा, चंद्रपूर

संपादन - नीलेश डाखोरे