मदत देण्यास हात आखडता का? 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 November 2019

  • 12 दिवसांनंतरही पहिल्या टप्प्यातील निधीचे पूर्ण वाटपच नाही 
  • सर्व शेतकऱ्यांना केव्हा मिळणार निधी? 
  • पहिल्या टप्प्यात 42 कोटी 17 लाखांचा निधी 
  • पूर्व विदर्भातील चार लाख शेतकरी बाधित 

नागपूर : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानासाठी सरकारने मदत दिली. ही मदत जवळपास तीन टप्प्यांत मिळणार असून, पहिल्या टप्प्यातील मदतीचे वाटप झाल्यावरच दुसऱ्या टप्प्यातील मदत मिळणार आहे. नागपूर विभागाला पहिल्या टप्प्यात 42 कोटी 17 लाखांचा निधी मिळाला. ही मदत ऑनलाइन थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वळती करायची आहे. 12 दिवसांचा काळ लोटल्यावरही अद्याप पूर्ण मदतीचे वाटप झालेले नाही. ही मदत वाटण्यात प्रशासनाचा हात आखडताच असल्याचे दिसते. पहिल्याच टप्प्यातील मदतीचे वाटप झाले नसल्याने संपूर्ण शेतकऱ्यांना मदत केव्हा मिळेल, असाच सवाल उपस्थित करण्यात येत आहे. 

परतीच्या पावसाने पूर्व विदर्भाला चांगलेच झोडपून काढले. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. त्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या सहा जिल्ह्यांत परतीच्या पावसामुळे तब्बल तीन लाख 81 हजार 4,400 शेतकरी बाधित झाले आहेत. त्यांचे एक लाख 89 हजार 198 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले. यामध्ये कापूस, सोयाबीन, धान, ज्वारी, संत्रा, मोसंबी, मका आदी पिकांचा समावेश आहे. 

सरकारच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे केरण्यात आले आहेत. या संकटात शेतकऱ्याला तातडीची मदत म्हणून पिकांचे पंचनामे झाले आहेत. प्रशासकीय पातळीवरील ही पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्याचा एकत्र अहवाल सरकारला पाठविण्यात आला आहे. पिकांसाठी हेक्‍टरी आठ हजार रुपये दोन हेक्‍टरपर्यंत मिळणार आहेत. तर फळपिकांसाठी हेक्‍टरी 18 हजार दोन हेक्‍टरपर्यंत मदत रक्कम मिळणार आहे. 

प्रशासन करते तरी काय?

पावसामुळे नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत एक लाख 89 हजार 198 हेक्‍टरवरचे नुकसान झाल्याचे अंतिम पंचनाम्यातून स्पष्ट झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईसाठी 148 कोटी 29 लाख 17 हजार रुपयांचा प्रस्ताव महसूल विभागाकडून सरकारकडे पाठविण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात विभागासाठी 42 कोटी 17 लाख 47 हजारांचा निधी मिळाला. 12 दिवसांत 55 टक्‍केच निधीचे वाटप करण्यात आले. त्यामुळे प्रशासन करते तरी काय, असाच सवाल उपस्थित होत आहे. 

 

जिल्हा निहाय माहिती         
जिल्हा बाधित क्षेत्र (हेक्‍टर) अपेक्षित निधी (लाखात) मिळालेला निधी वाटप निधी 
नागपूर 54202.51 4685.48 1336.93 294.82 
वर्धा 2071.82 140.91 40.25 40.17 
भंडारा 8806.08 1007.32 287.80 283.87 
गोंदिया 9533.53 936.04 266.07 283.87 
चंद्रपूर 97862 .72 6810.23 1945.75 1366.88 
गडचिरोली 16722 .10 1249.19 430.67 276.65 
एकूण 189198.76 14829.17 4217.47 2338.44 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is no allocation of funds to farmers