esakal | या बाजारात भाजीपाल्याला भाव नाही...शेतकरी सापडला संकटात
sakal

बोलून बातमी शोधा

गडचिरोली : येथील जिल्हा प्रेक्षागार मैदानात भरलेला दैनंदिन बाजार.

कोरोनाचे संकट सर्वच समाजघटकांवर कोसळत असताना भाजीपाला उत्पादक शेतकरीही यातून सुटले नाहीत. यंदा कोरोनामुळे लग्न सोहळेच न झाल्याने वांगे, भेंडीसह अनेक भाज्यांना मागणीच नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकवलेला भाजीपाला मातीमोल भावाने विकावा लागत आहे.

या बाजारात भाजीपाल्याला भाव नाही...शेतकरी सापडला संकटात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : यंदा कोरोनामुळे भाजीपाल्यांचे भावही घसरले आहेत. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना पिकवलेला भाजीपाला मातीमोल भावाने विकावा लागत आहे. भेंडी सध्या बाजारात दहा रुपये किलो दराने विकली जात आहे.

दरवर्षी उन्हाळ्यात वांगे आपला तोरा मिरवत असतात. कोणत्याही लग्न सोहळ्याच्या जेवणाला वांग्याशिवाय लज्जत नसते. याची मसालेदार रस्सेवाली भाजी अतिशय खमंग होत असल्याने अनेक खवय्ये वांग्याला प्रेमाने "एक टांग का मुर्गा' म्हणतात. पण, यंदा या एक टांगच्या मुर्ग्याला अजिबात मागणी नव्हती. त्यामुळे वांग्याचा भावही दहा रुपयांपर्यंत उतरला होता. पण, आता त्याची मागणी काहीशी वाढल्याने त्याच्या दरात सुधारणा होत आहे. पण, भेंडीला अतिशय वाईट दिवस आले आहेत.

लोकांना पावभर भेंडी घ्यायची सवय आहे. दहा रुपये किलो भेंडी म्हटल्यावर पाच रुपयांची अर्धा किलो भेंडी तरी कशी मागावी, असा प्रश्‍न ग्राहकांना पडतो. शिवाय सुट्या पैशांचीही समस्या असतेच. तिच गत सध्या चवळीच्या भाजीचीही आहे. या भाजीच्या सात जुड्या दहा रुपयांत मिळत आहेत.


शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी


बटाट्यांनी आपला नेहमीचा 30 रुपये किलोचा दर कायम राखला आहे. पण, उन्हाळ्यात नेहमी वाढणारी त्याची किमतही वाढली नाही. वांग्याच्या जोडीने मिरवणारे बटाटे यंदा शांतच होते. फक्त अनेकजण अजूनही बटाट्याचे चिप्स करत असल्याने त्याचा भाव अगदीच खाली उतरला नाही. पण, वाढलासुद्धा नाही. ढेमसेसुद्धा दरवर्षी पावसाळ्यात महागतात. पण, यंदा दहा रुपये पाव विकले जात आहेत. टमाटेसुद्धा 20 रुपये किलो दराने विकले जात आहे. त्यामुळे ग्राहकांना आनंद होत असला, तरी मोठ्या मेहनतीने भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. प्रचंड परिश्रमाने पिकवलेला भाजीपाला मिळेल त्या दराने विकावा लागत आहे. यात अनेकांचा वाहतुकीचा खर्चही निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे पीक कमी उगवले काय किंवा जास्त उगवले काय, अंतिम नुकसान शेतकऱ्यांचेच होत असल्याचे दिसून येत आहे.

काही ठिकाणी वाट्याचा हिशेब

सध्या सर्वांत कठीण दिवस भेंडीला आले आहेत. कुठे दहा रुपये , तर कुठे पाच रुपये किलो भेंडी विकली जात आहे. त्यातही ग्रामीण भागांत स्थिती अतिशय वाईट आहे. येथे किलो नव्हे, तर वाटेभर भेंडी दहा रुपये दराने विकण्याची पाळी विक्रेत्यांवर आली आहे. त्यामुळे कमी दिवसांत येणाऱ्या भेंडीची लागवड करणारे शेतकरी अधिक उदास झाले आहेत.

हेही वाचा : कारची ट्रकला धडक; भीषण अपघातात एक ठार, दोघे जखमी

भाज्यांचे दर

  • भाजी : दर (प्रतिकिलो)
  • भेंडी : 10 रुपये
  • वांगे : 20 रुपये
  • टमाटे : 20 रुपये
  • ढेमसे : 40 रुपये
  • बटाटे : 30 रुपये
  • फणस : 40 रुपये
  • मिरची : 40 रुपये
  • चवळी : 10 रुपयांत 7 जुड्या
  • अंबाडी : 5 रुपये जुडी