गडचिरोली जिल्ह्यातील तरुणांनो, खुश रहो! तुमच्यासाठी चालून येणार आता रोजगाराची संधी 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 May 2020

उपविभाग हेडरीअंतर्गत येणाऱ्या पोलिस मदत केंद्र आलदंडी हद्दीतील परसलगोंदी येथील गावतलावात वर्षानुवर्षे गाळ साठल्याचे निदर्शनास आले. या तलावाचे खोलीकरण केल्याने या भागातील पाण्याचा प्रश्‍न सुटण्यास मदत मिळणार होती.

गडचिरोली : पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या संकल्पनेतून परसलगोंदी तलावाचे पावसाळ्यापूर्वी खोलीकरण झाल्याने या गावातील तरुणांना मत्स्यशेतीतून रोजगार मिळणार आहे. 

या तलावात पाणी साठल्यानंतर पोलिस दलातर्फे स्थानिक बांधवांना मत्स्यबीज उपलब्ध करून दिले जातील. मत्सशेतीच्या माध्यमातून या भागातील अनेक तरुणांना रोजगार मिळण्यास मदत मिळेल. याच पद्धतीचा उपक्रम पावसाळ्यापूर्वी जिल्हाभरात राबविण्यात येणार असून मत्स्यशेतीतून अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पोलिस दल प्रयत्न करणार आहे, असे पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले. 

अवश्य वाचा-  जंगलात घात लावून केले त्याने महिनाभरात तिघांवर जीवघेणे हल्ले...

जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी गडचिरोली पोलिस दलातर्फे नेहमीच नावीन्यपूर्ण योजना हाती घेतल्या जातात. उपविभाग हेडरीअंतर्गत येणाऱ्या पोलिस मदत केंद्र आलदंडी हद्दीतील परसलगोंदी येथील गावतलावात वर्षानुवर्षे गाळ साठल्याचे निदर्शनास आले. या तलावाचे खोलीकरण केल्याने या भागातील पाण्याचा प्रश्‍न सुटण्यास मदत मिळणार होती. यामुळे पोलिस अधीक्षक बलवकडे यांच्या आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली हेडरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत गोसावी यांच्या नेतृत्वात सीआरपीएफ 191 बटालियनचे पोलिस निरीक्षक ठाकरे, प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक सुदर्शन आवारी, संदेश नाळे, अमित पाटील, अजित मोरे, विनायक माहुरकर, सोपान मुंढे, महेश सातपुते, किरण मगदूम, गोपाल इंदाळे, राहुल वानखेडे तसेच पोलिस कर्मचाऱ्यांनी मागील काही दिवसांपासून पसरलगोंदी गावतलावाचा पोकलेन, जेसीबी, ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने उपसा करून खोलीकरण केले.

पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी केले कर्मचाऱ्यांचे कौतुक

तलावातील गाळ शेतकऱ्यांच्या शेतामध्ये टाकल्यामुळे शेती उत्पादनात वाढ होण्यास मदत मिळेल. तलावातील गाळ उपसल्याने तलावाची पाणी साठविण्याची क्षमता वाढून अनेक शेतकऱ्यांना धान पिकविण्यासाठी व शेतीतून उत्पन्न वाढविण्यासाठी याचा लाभ होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अथक परिश्रम घेत तलावाचे खोलीकरण करण्यासाठी श्रमदान करणारे हेडरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत गोसावी, प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक सुदर्शन आवारी तसेच इतर पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी कौतुक केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There will be employment opportunities for the youths of Gadchiroli District