Balapur News : दोन चिमुकल्यांचा नदीपात्रात बुडून मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

drowne

Balapur News : दोन चिमुकल्यांचा नदीपात्रात बुडून मृत्यू

बाळापूर : बाळापूर शहरातून वाहणाऱ्या मननदी पात्रात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. २९) सायंकाळच्या सुमारास घडली. पारस येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्राच्या अधीकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे चिमुकल्यांचा जीव गेला असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

घटनेमुळे बाळापूर शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान सोमवारी (ता. ३०) जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी घटनास्थळाला भेट दिली. मो. दनियाल अब्दूल फैय्याज (वय ९ वर्ष) व मो. नवाब मोहमंद फईम (वय ६ वर्ष) अशी मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत.

बाळापूर शहरातून जाणाऱ्या मन नदीपात्रात पारस विद्युत निर्मिती प्रकल्पाचे पाणी थांबलेले आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेले पाणी साठविण्यासाठी पारस येथे मन नदीवर धरण बांधण्यात आलेले असून धरणाचे बॅक वॉटर मोठ्या प्रमाणात शहरातील नदीपात्रात साचलेले आहे. नदीकाठी असलेल्या गुलजारपुरा भागातील दोन चिमुकले सायंकाळच्या सुमारास नदीच्या काठावर खेळत होते. यादरम्यान तोल जाऊन दोघेही पाण्यात बुडाले. रविवारी (ता. २९) रात्री दोघांचेही मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले.

घटनेनंतर नागरिकांनी प्रशासनावर रोष व्यक्त केला आहे. काही काळ याठिकाणी तणावाची स्थिती निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तर दंगा काबू नियंत्रण कक्षाचे पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.

बाळापूरातील बाजार बंद

शहरातून वाहणाऱ्या नद्यांच्या तिरावर संरक्षण भिंत बांधण्याची नितांत आवश्यकता असताना सुद्धा विज वितरण कंपनीचे याकडे दुर्लक्ष होत आहे. या घटनेला विद्युत निर्मिती केन्द्राचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करीत नागरीक संतप्त झाले होते. घटनेमुळे सोमवारी बाळापूर शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. यापूर्वी सुद्धा अनेक जणांचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला आहे.

जिल्हाधिकारी निमा अरोरा यांची घटनास्थळी भेट

या घटनेमुळे समाजमन हेलावून गेले असून नागरिकांनी प्रशासनाविषयी रोष व्यक्त केला आहे. सोमवारी सकाळी अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी घटनास्थळाला भेट दिली. यावेळी उपस्थितांनी निमा अरोरा यांना घेराव घातला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पारस येथील विज निर्मीती केन्द्राच्या अधिकाऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा केली. घटनेला कोण जबाबदार आहे याची चौकशी करण्यात येणार असून त्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे निमा अरोरा यांनी सांगितले. नद्यांच्या तिरावर संरक्षण भिंत बांधण्यात येणार असल्याचे आश्वासन यावेळी दिले आहे. मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत कशी देता येईल याच्या सूचनाही बाळापूर तहसीलदार सय्यद ऐसानोद्दीन यांना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.