संचारबंदीत पोलिसांशी हुज्जत घालणे पडले मायलेकांना महाग 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

नजमा खान यांनी पोलिस पथकासोबत हुज्जत घालणे सुरू केले. एवढेच नाही, तर पाहून घेण्याची धमकी दिली. या प्रकाराचे चित्रीकरण महिला पोलिस कर्मचारी करीत होत्या. त्यामुळे नजमा खान यांनी महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या हातातील मोबाईल हिसकावून फेकून दिला.

चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या संचारबंदीदरम्यान गस्तीवर असलेल्या पोलिसांशी माय-लेकाने चांगलाच वाद घातला. त्यानंतर चित्रीकरण करणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या हातातून मोबाईल घेत फेकून दिला. ही घटना बुधवारी (ता. 25) दुपारी 12 वाजताच्या सुमारात तुकुम परिसरातील पेट्रोल पंप परिसरात घडली. माय-लेकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तनसीन खान आणि नजमा खान अशी गुन्हा दाखल झालेल्या मायलेकाची नावे आहेत. 

अवश्य वाचा-  घरी बसूनच करता येतील बँकांचे व्यवहार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉक डाऊनची घोषणा केली आहे. प्रत्येकाने आपली काळजी घेत घरीच राहण्याचा सल्ला दिला. संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी बुधवारी दुपारी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरात गस्तीवर होते. तुकुम परिसरातील बियाणी पेट्रोल पंप परिसरात तनसीन खान हा युवक रस्त्याने फिरताना आढळून आला. यावेळी पोलिस पथकाने त्या युवकाला थांबवून कोरोनाची लागण होऊ नये यासाठी मास्क का वापरला नाही, अशी विचारणा केली. या कारणातून पोलिस कर्मचारी आणि त्या युवकामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर सदर युवकाने थेट घर गाठून आई नजमा खान यांना बोलावून आणले. 

वाद घालून पोलिस महिलेच्या हातातील फेकला मोबाईल

नजमा खान यांनी पोलिस पथकासोबत हुज्जत घालणे सुरू केले. एवढेच नाही, तर पाहून घेण्याची धमकी दिली. या प्रकाराचे चित्रीकरण महिला पोलिस कर्मचारी करीत होत्या. त्यामुळे नजमा खान यांनी महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या हातातील मोबाईल हिसकावून फेकून दिला. यात मोबाईल फुटला. यानंतर पोलिसांनी या मायलेकांना ताब्यात घेत रामनगर पोलिस ठाण्यात आले. दोघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे, पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे असे गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिस पथकात सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र बोबडे, पंडित वऱ्हाटे, सुरेश केमेकर, मिलिंद चव्हाण, अनूप डांगे, अमोल पंधरे यांच्यासह दोन महिला कर्मचाऱ्यांचा समावेश होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: They argue with Police and Police put them into the jail.