"ते' सर्व मुंबईहून आले मात्र अमरावतीत अडकले, पत्रकार देवासारखे धावले! 

Amravati Railway station
Amravati Railway station

अमरावती : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून पंतप्रधानांनी रविवारी एक दिवसाचा "जनता कर्फ्यू' घोषित केला होता. या कर्फ्यूच्या वृत्तसंकलनासाठी फिरणाऱ्या काही पत्रकारांनी सामाजिक बांधिलकीचा परिचय देत अडचणीत सापडलेल्या रेल्वे प्रवाशांना प्रशासनाच्या पुढाकारातून मदतीचा हात दिला. 

त्याचे झाले असे की, जगातील संपूर्ण नागरी जीवन धोक्‍यात आणणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पंतप्रधानांनी रविवारी एक दिवसाचा "जनता कर्फ्यू' घोषित केला होता. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शासकीय, निमशासकीय आणि खासगी कार्यालयांना सेवा थांबवून सहकार्य करण्याचे आदेश दिले होते. तसेच सामान्य जनतेला घराबाहेर न पडण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे रविवारी शहरात सर्व जनतेकडून जणू "कडकडीत बंद'च पाळण्यात आला होता. एसटी बस, ऑटोरिक्‍क्षा, खासगी वाहने सर्व सेवा बंद झाल्या होत्या. दरम्यान, नियमित वेळेपेक्षा बरीच उशिरा मुंबईहून येणारी अंबा एक्‍स्प्रेस अमरावतीच्या मॉडेल रेल्वेस्थानकावर पोहोचली. जे स्थानिक प्रवासी होते, त्यांनी आपल्या नातेवाइकांना फोन करून घेऊन जाण्यासाठी रेल्वेस्थानकावर बोलावून ते निघून गेले. परंतु 35 ते 40 महिला, पुरुष, युवक, युवती असे होते की, ज्यांना वरुड, मोर्शी तर काहींना नागपूरला जायचे होते. परंतु जनता कर्फ्यूमुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून एस.टी. सेवासुद्धा बंद ठेवली होती. 

जिल्हाधिकाऱ्यांनी केली एसटी अधिकाऱ्यांशी चर्चा 

मॉडेल रेल्वेस्थानकावर उतरलेले प्रवासी आपल्या गावी जाण्यासाठी अमरावती मध्यवर्ती बसस्थानकात आले तर काही रेल्वेस्थानकावरच थांबले. याच दरम्यान कर्फ्यूचे वृत्त संकलनासाठी फिरणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना हे दृश्‍य दिसले. त्यांनी अडकलेल्या प्रवाशांची चौकशी केली. त्यांची आपबिती ऐकल्यानंतर त्यांनी लगेच जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बोलून तत्काळ एका एस.टी. बसची व्यवस्था या प्रवाशांना त्यांच्या गावी पोहोचवून देण्यासाठी करून दिली. परंतु अमरावतीहून निघणारे सर्वच प्रवासी मुंबई येथून अमरावतीत आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून गावी जाण्यापूर्वी त्यांची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे एस.टी.त बसलेले सर्व प्रवासी प्रथम जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचले. तेथे त्यांची प्राथमिक तपासणी झाली. त्यात कोरोनाचे कुठलेही प्राथमिक लक्षण आढळले नाही. त्यामुळे त्या सर्वांना एस.टी.ने त्यांच्या निर्धारित ठिकाणी पोहोचवून दिले. 

चोरांना कशाचे सोयरसुतक...

अत्यावश्‍यक सेवा उपलब्ध करून दिल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाचे वाहतूक निरीक्षक सुधीर चंद्रकांत जोशी हे एमएच 27 एक्‍यू 6088 क्रमांकाच्या दुचाकीने जिल्हा सामान्य रुग्णालयात आले. त्यांनी दुचाकी प्रवेशद्वाराच्या आत उभी करून ते प्रवाशांच्या चौकशीसाठी गेले. तासभराने दुचाकीजवळ आले असता, त्यांची दुचाकी चोरीस गेल्याचे निदर्शनात आले. त्यामुळे चोरांना राष्ट्रीय, सामाजिक हिताचे काहीही देणे-घेणे नाही. शेवटी ते चोरच. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com