झाडावर चढून बोरं खाणे पडले त्यांना भारी... 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 January 2020

चिमूर वन परिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या सावरी बिडकर या गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात मंगळवारी दुपारच्या सुमारास झाडावरील बोरं खाण्यासाठी दोन अस्वली आल्या.

चिमूर (जि. चंद्रपूर) : बोरं खाण्याच्या निमित्ताने जंगलातून शेतात आलेल्या दोन अस्वली मंगळवारी दुपारच्या सुमारास शेतातील विहिरीत पडल्या. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळताच बचाव मोहीम राबवून दोन्ही अस्वलींना विहिरीबाहेर काढून जंगलात सोडून देण्यात आले. 

झाडावर चढताना सुटले नियंत्रण

चिमूर वन परिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या सावरी बिडकर या गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात मंगळवारी दुपारच्या सुमारास झाडावरील बोरं खाण्यासाठी दोन अस्वली आल्या. दोघीही बोरीच्या झाडावर बोर खाण्यासाठी चढू लागल्या. मात्र, चढता-चढता दोघींचेही संतुलन बिघडले आणि त्या झाडाला लागून असलेल्या विहिरीत पडल्या. शेतमालक राजेंद्र निकोसे विहिरीकडे जात असताना आवाज आला. त्यांनी डोकावून बघितले तेव्हा त्यांना दोन अस्वली विहिरीत पोहत असताना दिसल्या. त्यांनी याची माहिती गावात येऊन चिमूर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना दिली. 

अवश्‍य वाचा- मनोरुग्णालयाच्या दगडी भिंतीही गहिवरल्या... 

वनविभागाची बचाव मोहीम सुरू

माहिती मिळताच चिमूर वनपरिक्षेत्राची चमू घटनास्थळी पोहोचली. अस्वलांना बाहेर काढण्यासाठी वनाधिकारी आणि चमूने शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, गावकऱ्यांनी त्यांना पिंजऱ्यात पकडून जंगलात सोडण्याची मागणी केली होती. रात्र झाल्यामुळे वनविभागाचा पहारा शेतात लावण्यात आला. त्यानंतर वनविभागाने या दोन्ही अस्वलांना बाहेर काढण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी भाविक चिवंडे यांच्या नेतृत्वात बचाव मोहीम राबविली. वनकर्मचाऱ्यांनी विहिरीवर नेट टाकून दहा फूट खोल विहिरीत शिडी टाकली. अस्वल शिडीच्या साहाय्याने वर येण्याची वाट पहात होते. रात्री एक वाजता एक, तर तीन वाजता दुसरे अस्वल शिडीने वर आले. या दोन्ही अस्वलांना वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद करून रात्री खडसंगी येथील वनविभागाच्या विश्रामगृहावर आणण्यात आले. दोन्ही अस्वलांची विशेष पशु चिकित्सक खोब्रागडे यांनी तपासणी केली. त्यानंतर त्यांना जंगलात सोडून देण्यात आले. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: `They` had to climb up a tree and eat Jujube..