टाळेबंदीचे नियम पाळत झाले त्यांचे शुभमंगल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 मे 2020

50 माणसांच्या उपस्थितीत विवाह करण्याबाबत सूचना शासनाकडून करण्यात आल्या. सहायक संवर्ग विकास अधिकारी कोमलवार यांनी शासनाच्या अटी व शर्तीचे पालन करून व रीतसर परवानगी घेऊन आपल्या मुलीचे लग्न आरमोरीपासून 3 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गडचिरोली - चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरील वैनगंगा नदीच्या काठावरच्या फार्म हाउसवर आयोजित केले.

आरमोरी (जि. गडचिरोली) : माणसांच्या गोतावळ्यात सर्वांच्या आशीर्वादाने होणाऱ्या लग्नसोहळ्यांचे समीकरण सध्याच्या परिस्थितीत बदलले आहे. मात्र, प्रत्येकाला आपला विवाहसोहळा हा नेहमीसाठी स्मरणात राहणारा असावा, अशी इच्छा असते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लग्न समारंभाचा थाट गेला असला, तरी अनेकजण साध्या पद्धतीने हा समारंभ पार पडताना आपले सामाजिक भानही जपत आहेत. असाच एक विवाहसोहळा शुक्रवारी (ता. 29) गडचिरोली- चंद्रपूरच्या सीमेवर पार पडला.
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्‍यातील लोंढोली येथील रहिवासी तथा आरमोरी पंचायत समितीचे सहायक संवर्ग विकास अधिकारी मुक्तेश्‍वर कोमलवार यांची ज्येष्ठ कन्या शीतल हिचे लग्न चंद्रपूर जिल्ह्यातील भटाळी येथील रहिवासी असलेल्या मुलाशी 4 महिन्यापूर्वीच ठरले होते. देशात लॉकडाउन व संचारबंदी लागण्यापूर्वीच वधू व वरपक्षांकडील लोकांनी 18 मे ही लग्नाची तारीख निश्‍चित केली होती. दोन्ही पक्षांनी लग्नपत्रिकासुद्धा छापल्या होत्या. लग्नाची तयारी झाली होती. मात्र अचानक कोरोनाचा शिरकाव झाल्याने व लॉकडाउन वाढतच गेल्याने विवाह सोहळ्यांवर निर्बंध लादण्यात आले. त्यामुळे दोन्ही पक्षांनी 18 मे ही लग्नाची तारीख रद्द केली. दरम्यान 50 माणसांच्या उपस्थितीत विवाह करण्याबाबत सूचना शासनाकडून करण्यात आल्या. सहायक संवर्ग विकास अधिकारी कोमलवार यांनी शासनाच्या अटी व शर्तीचे पालन करून व रीतसर परवानगी घेऊन आपल्या मुलीचे लग्न आरमोरीपासून 3 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गडचिरोली - चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरील वैनगंगा नदीच्या काठावरच्या फार्म हाउसवर आयोजित केले. वधू व वरपक्षाकडील 50 आप्त ,स्वकीयांच्या व आरमोरी येथील विविध विभागांतील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता हा लग्न समारंभ साध्या पद्धतीने पार पाडला. सामाजिक अंतर ठेवून नवदाम्पत्यासह इतरांनी मास्क वापरून उपस्थिती दर्शविली. उपस्थितांनी पुष्पवर्षाव करून वधूवरास आशीर्वाद दिला. तत्पूर्वी वधू व वरपक्षाकडील लग्नासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य पथकाकडून आपली तपासणी करून घेतली. नंतरच त्यांनी लग्नस्थळी प्रवेश केला. या विवाह समारंभाचे साक्षी होण्यासाठी आरमोरीचे तहसीलदार कल्याणकुमार डहाट, आरमोरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, नायब तहसीलदार विजय कावळे, आरमोरी पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी चेतन हिवंज, तालुका आरोग्य अधिकारी आनंद ठिकरे, बालविकास प्रकल्प अधिकारी नागेश ठोंबरे, दारूबंदी पथकाचे हवालदार नरेश सहारे, पत्रकार रूपेश गजपुरे, महेंद्र रामटेके, राजकुमार दहिकार, पंचायत विस्तार अधिकारी प्रभाकर रायपुरे, आरोग्य विस्तार अधिकारी कोंडावार,गेडाम, प्रदीप मेश्राम, देवानंद जनबंधु, गांगलवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच भोयर, तंटामुक्ती अध्यक्ष , सचिव आदी उपस्थित होते.

सविस्तर वाचा - काय सांगता...! लॉकडाऊननंतर असं बदललं देहव्यापाराचं गणित
 
प्रशासनाला दिली आरोग्य किट
आपल्या मुलीच्या लग्नाचे औचित्य साधून सहायक संवर्ग अधिकारी कोमलवार यांनी वधू-वरांच्या तसेच पाहुणे व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाला आरोग्य किट भेट दिली. आरोग्य विभागाला दिलेल्या या किटमध्ये 50 सर्जिकल हॅण्ड ग्लोव्हज, 200 डिसपोजल हॅण्डग्लोव्हज, एक हजार मास्क, सॅनिटाझजरच्या 5 लिटरच्या दोन कॅन आदी साहित्याचा समावेश आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: They married during lockdown bu following all rules of social distancing