किती ही थट्टा! शासनाला हवे आहेत पुराचे पुरावे

श्रीकांत पेशट्टीवार
Tuesday, 8 September 2020

वैनगंगा नदीला आलेल्या पुराने तालुक्‍यातील अनेक गावांत पाणी शिरले. किन्ही, लाडज, बरडकिन्ही, खरकाडा, नवेगाव, रणमोचन ही गावे शंभर टक्के पूरबाधित आहे.

चंद्रपूर : गोसेखुर्द धरणाचे 32 दरवाजे उघडण्यात आल्याने वैनगंगा नदीला पूर आला. या पुराचा ब्रह्मपुरी तालुक्‍याला मोठा फटका बसला. अनेकांची घरे वाहून गेली. हजारो हेक्‍टर पीक उद्‌ध्वस्त झाले. आता प्रशासनाने पूरग्रस्त गावांत सर्वेक्षण सुरू केले आहे. मात्र, चुकीच्या पद्धतीने सर्वेक्षण सुरू आहे. सडलेले धान्य दाखवा, भिजलेले कपडे दाखवा, असे सांगून पूरग्रस्तांची प्रशासनाने थट्टा चालविली असल्याचा आरोप आपच्या महाराष्ट्र राज्य समिती सदस्य ऍड. पारोमिता गोस्वामी यांनी पत्रकार परिषदेला केला.

वैनगंगा नदीला आलेल्या पुराने तालुक्‍यातील अनेक गावांत पाणी शिरले. किन्ही, लाडज, बरडकिन्ही, खरकाडा, नवेगाव, रणमोचन ही गावे शंभर टक्के पूरबाधित आहे. पालकमंत्र्यांनी या गावांना तातडीची आर्थिक मदत, शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यानंतर काही पूरग्रस्त गावांत पंचनामे सुरू आहेत. मात्र, या कामास विलंब होत आहे. पूरग्रस्तांना दहा हजार रुपये देण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी जाहीर केले. मात्र, अद्याप मदतीची ही रक्कम मिळाली नाही. आता मात्र पाच-पाच हजार रुपयेच देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

पुराच्या पाण्यात अनेक घरांचे नुकसान झाले. घरांना भेगा पडल्या तरी त्याच्या नुकसानाची नोंद घेतली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. पुरामुळे पीक उद्‌ध्वस्त झाले. त्याची रक्कम तातडीने मिळण्याबाबत शासन काहीच बोलण्यास तयार नाही. संजय सरोवर आणि अन्य धरणे भरल्यावर गोसेखुर्दचे दरवाजे उघडणे आवश्‍यक होते. मात्र, पाणी सोडण्याबाबत कोणत्याही गावांत साधी दवंडीही देण्यात आली नाही. शेवटच्या क्षणापर्यंत गावकऱ्यांना अंधारात ठेवून गोसेखुर्दचे दरवाजे उघडण्यात आले, असा आरोप ऍड. गोस्वामी यांनी केला.

सविस्तर वाचा - दमदार पाऊस व महापुराने उडवली दाणादाण; आता प्रादेशिक हवामान विभागाने दिला हा इशारा

महाविकास आघाडीचा प्रादेशिक भेदभाव
जून महिन्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला चक्रीवादळाचा फटका बसला. त्यानंतर सरकारने या गावांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला होता. मात्र, विदर्भात आलेल्या पुराकडे महाविकास आघाडी दुर्लक्ष करीत आहे. पाच जिल्ह्यांचे पुरात मोठे नुकसान झाले. मात्र, महाविकास आघाडीचे कोणतीही मंत्री इकडे आले नाही. पालकमंत्री महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री आहे. मात्र, तेही विदर्भाला न्याय मिळवून देण्यास यशस्वी ठरले नसल्याचेही ऍड. गोस्वामी यांनी सांगितले.

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: They want Evidence of flood