चोरी करायला गेले अन्‌ जीव घेऊन आले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

श्‍यामनगर येथे सपन फकिर हलदर (वय 70) हे राहत होते. त्यांची पाचही मुले बाहेरगावी राहतात. पत्नीच्या निधनानंतर ते एकटेच राहत होते. 29 ऑक्‍टोबर 2019 ला त्यांचा खून झाल्याची घटना उघडकीस आली.

चंद्रपूर : घरात चोरी करण्याच्या उद्देशातून प्रवेश केला. मात्र, घरातील वृद्ध जागा झाला. त्यामुळे चोरट्यांनी लोखंडी रॉडनी हल्ला करून जीव घेतला. तब्बल चार महिन्यानंतर या खुनाच्या घटनेचे रहस्य उलगडण्यात रामनगर पोलिसांना यश आले. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. रघुवीरसिंग उर्फ मोहित बसगोपाल ठाकूर (वय 30), पीयूष आनंद तांबे (वय 19) अशी अटकेतील युवकांची नावे आहेत.

 

गुन्हा दाखल करून तपास सुरू

श्‍यामनगर येथे सपन फकिर हलदर (वय 70) हे राहत होते. त्यांची पाचही मुले बाहेरगावी राहतात. पत्नीच्या निधनानंतर ते एकटेच राहत होते. 29 ऑक्‍टोबर 2019 ला त्यांचा खून झाल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणाची तक्रार त्यांचा नातेवाईक गौरव पीयूष मंडल (वय 23, रा. बंगाली कॅम्प) यांनी रामनगर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. स्थानिक गुन्हे शाखेला तपासादरम्यान जुनोना चौक परिसरातील बंगाली वॉर्डातील रघुवीरसिंग उर्फ मोहित बसगोपाल ठाकूर आणि सिटी शाळेच्या मागील भागातील पीयूष तांबे हे दोघे घटनेच्या दिवशी रात्रीच्या सुमारास श्‍यामनगरात फिरत असल्याची माहिती मिळाली. 
त्यानंतर पोलिसांनी या दोघांना अटक केली.

 

अवश्‍य वाचा- शहरात महिला चोरांची दहशत, बसमधील प्रवाशांकडून पळवला लाखोंचा ऐवज

 

लोखंडी रॉडनी हल्ला

तपासादरम्यान या दोघांनी चोरीसाठी घरात प्रवेश केला. मात्र, सपन हलदर हे जागे झाल्याने लोखंडी रॉडनी त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाल्याची कबुली दिली. पोलिसांनी या दोघांना न्यायालयात हजर केले असता 7 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणाचा तपास पोलिस अधीक्षक डॉ. महेश्‍वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र बोबडे, पोलिस उपनिरीक्षक विकास मुंढे, पंडित वऱ्हाटे, महेंद्र भुजाडे, केमेकर, अविनाश दशमवार, मनोज रामटेके, संजय आतुकलवार, अनुप डांगे, प्रकाश बल्की, कुंदन बावरी, संजय वाढई, जावेद सिद्धीकी, प्रांजल झिलपे, नितीन यांच्या पथकाने केली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: They went to steal and brought life