"ते' क्रिकेट ट्रॉफी जिंकून भरधाव जात होते, अन्‌ झाले अघटित...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 डिसेंबर 2019

14 वर्षांखालील खेडाळूंसाठी आयोजित क्रिकेट स्पर्धेची ट्रॉफी जिंकून हे सर्वजण वर्धा येथे एम. एच. 32-एएच- 3777 क्रमांकाच्या कारने जात होते. दरम्यान, भोसा मार्गावरील पुलाजवळ कारवरील चालकाचे नियंत्रण सुटून कार रस्ता दुभाजकावर आदळली.

यवतमाळ : क्रिकेट सामने खेळून गावाला परतणाऱ्या खेळाडूंची भरधाव कार रस्ता दुभाजकावर धडकल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी (ता.28) संध्याकाळच्या सुमारास येथून 20 किलोमीटरवर असलेल्या कोळंबी आश्रमशाळेजवळ घडली. 

क्रिकेट ट्रॉफी जिंकून मुले परतत होती 

मिळालेल्या माहितीनुसार, 14 वर्षांखालील खेडाळूंसाठी आयोजित क्रिकेट स्पर्धेची ट्रॉफी जिंकून हे सर्वजण वर्धा येथे एम. एच. 32-एएच- 3777 क्रमांकाच्या कारने जात होते. दरम्यान, भोसा मार्गावरील पुलाजवळ कारवरील चालकाचे नियंत्रण सुटून कार रस्ता दुभाजकावर आदळली. या अपघातात जयेश प्रवीण लोया (वय 11), अक्षद अभिषेक बैद (वय 11) यांचा जागीच मृत्यू झाला. तर दर्श सुमित ढाबलिया आणि रुमित अजय उर्फ कवडू गलांडे अशी जखमींची नावे असून सर्व वर्धा येथील रहिवासी आहे. 

अवश्‍य वाचा- व्वारे डॉक्‍टर! युवतीला केली शरीरसुखाची मागणी 

चालकाचे कारवरील सुटले नियंत्रण 

चालकाचे भरधाव कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्ता दुभाजकावर जाऊन आदळली. ही धडक एवढी जोरदार होती की यात कारच्या डाव्या बाजूचे दोन्ही दरवाजे तुटून पडले. त्यामुळे कारमध्ये तुटलेल्या दरवाजांच्या बाजूने बसलेल्या जयेश लोया आणि अक्षद बैद यांचा जागीच मृत्यू झाला, तर कारचालकासह दोनजण जखमी झाले. भीषण अपघात झाल्याचे कळताच आश्रमशाळेजवळील ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांनी दुसऱ्या वाहनाने जखमींना तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती पोलिसांना कळताच अवधुतवाडी पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक सुयोग महापुरे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "They were going with 'Cricket Trophy', and happend unseen ...