त्यांना वन्यप्राण्यांची चिंता; तर आम्हाला माणसांची! : हंसराज अहीर 

राजकुमार भीतकर 
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

यवतमाळ : अवनी (टी-1 वाघिणी) ला ठार केल्यानंतर वन्यजीवप्रेमींनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. विविध आरोप केले. भाजपच्या केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनीही वनमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या पार्श्‍वभूमिवर बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी वन्यजीवप्रेमींना वन्यप्राण्यांची चिंता होती; तर आम्हाला माणसांची होती असे मत व्यक्त करून वनमंत्र्यांची पाठराखण केली. ते मंगळवारी (ता. 13) येथील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, आमदार राजू तोडसाम, माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर, उद्धव येरमे व अमोल ढोणे आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना अहीर म्हणाले की, अवनीने 13 लोकांचे बळी घेतले. ती नरभक्षक झाल्याने तिला ठार करावे अशी लोकांचीच मागणी होती. वाघीणीला ठार करावे, अशी सरकारची इच्छा नव्हती. परंतु, सरकारला वन्यप्राण्यांपेक्षा माणसांचे जीव महत्त्वाचे होते, असे सांगून त्यांनी राज्यसरकाची पाठ थोपटली. 

पुढे अहीर म्हणाले की, लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका एकत्र होणार नाहीत. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी तसे संकेत दिले आहेत. भाजप केंद्रात सत्तेवर आल्यापासून विधानसभेच्या निवडणुका जिंकत आहेत, आगामी सर्व निवडणुका जिंकणार असल्याचा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. कर्नाटक पोटनिवडणुकीतील पराभवाबद्दल बोलताना ते म्हणाले की, सत्तर वर्षांच्या इतिहासात सत्ताधारी पक्षाचा पोटनिवडणुकीत पराभवच झाला आहे.

शिवसेना-भाजपसोबतच
शिवसेना भाजप युती ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच सुरू केली आहे. ती कायम राहणार असून यावेळी शिवसेना व भाजप एकत्रच निवडणूक लढेल. आजही सोबत लढू व भविष्यातही सोबतच राहू, असा विश्‍वास हंसराज अहीर यांनी व्यक्त केला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: They worry about wild animals So man says Hansraj Ahir