पायदळ जाताय ना, मग मोबाईलवर बोलू नका; चोरटे आहेत तुमच्या मागावर!

संतोष ताकपिरे
Sunday, 4 October 2020

राजापेठ हद्दीत क्रांती कॉलनीतील दिल्ली पब्लिक स्कूलजवळून भास्कर दिगंबर प्रभुणे हे रस्त्याने पायदळ जाताना मोबाईलवर बोलत होते. त्यांचा पाठलाग करीत आलेल्या दुचाकीस्वाराने त्याचा १५ हजार रुपयांचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला.

अमरावती ः रहदारीच्या रस्त्यावरून पायदळ जाणाऱ्यांचे मोबाईलवर बोलणे घातक ठरत असल्याचे अलिकडच्या घटनांवरून दिसून येत आहे. कारण तुम्ही मोबाईलवर बोलत असताना पाठीमागून हळूच येणारा दुचाकीस्वार तुमच्या हातातील मोबाईल कधी हिसकावून पळून जाईल याचा नेम राहिला नाही. शनिवारी (ता. तीन) राजापेठ व बडनेरा हद्दीत दोघांचे मोबाईल अशाच भामट्यांनी हिसकावून पळ काढला. 

राजापेठ हद्दीत क्रांती कॉलनीतील दिल्ली पब्लिक स्कूलजवळून भास्कर दिगंबर प्रभुणे हे रस्त्याने पायदळ जाताना मोबाईलवर बोलत होते. त्यांचा पाठलाग करीत आलेल्या दुचाकीस्वाराने त्याचा १५ हजार रुपयांचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला. राजापेठ पोलिसांनी प्रभुणे यांच्या तक्रारीवरून मोबाईल पळवून नेणाऱ्या अनोळखी दुचाकीस्वाराविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. 

"आई! सांग ना माझी काय चूक? तुझा चेहरा बघण्याआधीच माझ्या नशिबी उकिरडा का"?
 

राजापेठ हद्दीतील घटनेनंतर अवघ्या दहा ते पंधरा मिनिटातच तशीच घटना बडनेरा ठाण्याच्या हद्दीत जुनीवस्ती बैलबाजारात पेट्रोलपंपासमोर सायंकाळी पावणेसातच्या सुमारास घडली. या घटनेत फरदीन खान वल्द फिरोज खान (वय १८) हा युवक कामावरून परत येत असताना रस्त्याने आईचा फोन आला. म्हणून तो रस्त्याने जाताना फोनवर बोलत होता. तेवढ्यात अचानक दुचाकीवरून आलेले दोघेजण फरदीन खानजवळ थांबले. त्यापैकी एकाने त्याला पत्ता विचारला तर, दुसऱ्याने त्याच्याकडील सात हजार रुपयांचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला. फरदीन खान याच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनीही जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. 

#SundaySpecial : `झणझणीत सावजी मटण` खाल्ल का... वाचा मग कसा झाला जन्म 
 

दोन्ही घटनेमागे एकच टोळी

आधी राजापेठ व दहा मिनिटातच बडनेरा हद्दीत सारख्याच घटना घडल्या. त्यात दोन्ही घटनेमागे एकच टोळी असल्याची शक्‍यता पोलिस पडताळून बघत आहेत. महिनाभरापूर्वी एकाच दिवशी रस्त्याने जाणाऱ्या तीन युवतींचे मोबाईल अशाच पद्धतीने हिसकावून नेण्यात आले होते. त्याचा अद्याप शोध लागलेला नाही. 

संपादन ः राजेंद्र मारोटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The thieves snatched the mobile phone and ran away