esakal | नैसर्गिक आपत्तीनंतर बळीराजापुढे निर्माण झालं नवं संकट; जिल्ह्यात चोरट्यांचा प्रचंड धुमाकूळ

बोलून बातमी शोधा

farmer
नैसर्गिक आपत्तीनंतर बळीराजापुढे निर्माण झालं नवं संकट; जिल्ह्यात चोरट्यांचा प्रचंड धुमाकूळ
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : ग्रामीण भागात चोरीच्या घटना वाढल्या. बारा शेतकऱ्यांना जवळपास 5 लाख 17 हजार रुपयांचा फटका बसला. एकीकडे नैसर्गिक आपत्ती तर दुसरीकडे चोऱ्यांमुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला.

हेही वाचा: काय सांगता! स्मशानभूमीतील फुले घराच्या देवालयात; अंधश्रद्धेला फाटा देत स्मशानभूमीत भजन कीर्तन

जिल्ह्यातील कुऱ्हा ठाण्याच्या हद्दीत वाढोणा शिवारात उमेश काळमेघ यांच्या शेतातील झोपडीत ठेवलेले 15 क्विंटल सोयाबीन व 16 क्विंटल चणा, असे एकूण 69 हजार रुपयांचे धान्य कुणीतरी चोरून नेले. शेतातील नोकर शंकर राठोड (वय 42) यांच्या तक्रारीवरून कुऱ्हा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. दुसरी घटना कुऱ्हा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वडुरा गावात घडली. येथील विनायक रामचंद्र पोकळे (वय 37) यांच्या शेतातील पोल्ट्री फॉर्ममधील 30 कोंबड्यांसह 3 कोंबडे (किंमत 6 हजार 600) चोरीस गेले. श्री. पोकळे यांच्या तक्रारीवरून कुऱ्हा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

शेतातील चोरीची तिसरी घटना माहुली जहांगीर ठाण्याच्या हद्दीत नरसिंगपूर ते देवरा मार्गावरील यावली शहीद गावात घडली. दामोधर नामदेव पटके यांच्या शेतात त्यांनी गोटफॉर्मचा व्यवसाय सुरू केला. त्यांच्या गोदामातील गोटफॉर्ममधील 81 नग बकऱ्या व बोकूड, अशा चार लाख रुपये किंमतीच्या बकऱ्या एका वाहनात टाकून लंपास करण्यात आल्या. चोरी झाली तेव्हा शेतातील रखवालदार उकंडराव बिचके हे तेथे हजर नव्हते. शेतमालक दामोधर पटके यांच्या तक्रारीवरून माहुली जहांगीर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल झाला.

हेही वाचा: यवतमाळच्या खासगी हॉस्पिटलची देशभक्ती; पुलवामात तैनात असलेल्या सैनिकाच्या मातोश्रीवर मोफत उपचार

वरुड तालुक्‍यातील नायगाव येथील सहा शेतकऱ्यांच्या शेतातील प्रत्येकी शंभर मीटर केबल 12 हजार रुपये किंमतीचा चोरट्यांनी लंपास केला. हरिभाऊ मोतीराम वडसकर, गजानन मारोतराव उमाळे, गणपत भीमराव हिवसे, सुनील केशव राऊत, प्रकाश गलफळ या शेतकऱ्यांच्या शेतातून केबल चोरीस गेला. वरुड पोलिसांनी श्री. वडस्कर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. वरुड तालुक्‍यातच बेनोडा ठाण्याच्या हद्दीत परसोना शिवारात माधव मोतीराम गोहाड (वय 68) यांच्या शेतातील गोठ्यातून एक गाय व कालवड, अशी 30 हजार रुपये किंमतीची दोन जनावरे चोरीस गेली. बेनोडा पोलिसांनी गोहाड यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.

संपादन - अथर्व महांकाळ