संधी मिळताच चोरट्यांनी लांबवले ४० लाखांचे सोने, रोकड

शशांक देशपांडे 
Thursday, 24 December 2020

गुरुवारी बाजार असल्याने मार्केटमध्ये गर्दी होती. दुकानाची साफसफाई केल्यावर ते मागे झाडू ठेवण्याकरिता गेले. परत आले असता, त्यांची बॅग त्यांना दिसली नाही. 

दर्यापूर (जि. अमरावती) : दर्यापुरातील बनोसा मार्केटमधील राजदीप ज्वेलर्स या प्रतिष्ठानातून ७५० ग्रॅम सोने व रोकड असलेली बॅग घेऊन युवकाने पळ काढला. या घटनेत दोघांचा समावेश असल्याची शक्‍यता आहे. गुरुवारी (ता. २४) भरदिवसा ११ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

वर्दळीच्या ठिकाणी दीपक प्रांजळे यांचे ज्वेलरी दुकान आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास श्री. प्रांजळे दुकानात साफसफाई करीत होते. ते नियमित सोने व रोकड बॅगमध्ये आणत होते. आज ते दुकानात आले, त्यावेळी त्यांच्या बॅगमध्ये ७५० ग्रॅम सोने व ७० हजारांची रोकड होती. गुरुवारी बाजार असल्याने मार्केटमध्ये गर्दी होती. दुकानाची साफसफाई केल्यावर ते मागे झाडू ठेवण्याकरिता गेले. परत आले असता, त्यांची बॅग त्यांना दिसली नाही. 

हेही वाचा - सिंचनाच्या क्षेत्रात होत नाही सोयाबीनचे उत्पादन, प्रशासनाचा जावईशोध 
 

काउंटरमधील गादीवर बुटाचे निशाण उमटल्याचे दिसले. जवळपास ४० लाख रुपये किमतीचे सोने व रोकड असलेली बॅग काउंटरमध्ये नसल्याने ते घाबरले. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. त्यात सोन्याने भरलेली बॅग चोरून पळून जाणारा एक मुलगा दिसत आहे. मात्र त्याची ओळख पटली नाही. असे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक तपन कोल्हे यांनी सांगितले. दरम्यान, सायंकाळपर्यंत याप्रकरणात गुन्हा दाखल झाला नसल्याचे दर्यापूरचे ठाणेदार प्रमेश आत्राम यांनी सांगितले. 
 

चोरटे लवकरच गजाआड
सीसीटीव्ही फुटेजमध्ये बॅग घेऊन पळणारा व्यक्ती दिसत आहे. तपासात घटनाक्रम उघडकीस येईल. आम्ही कसून तपास करीत आहोत, लवकरच चोरट्यांना बेड्या पडतील.
-तपन कोल्हे, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, ग्रामीण. 

 
संपादन : अतुल मांगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thieves stole forty lakh in gold and cash