अमरावतीत चोरांचा सुळसुळाट, एकाच रात्रीत सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल लंपास

संतोष ताकपिरे
Tuesday, 3 November 2020

गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील अर्जुननगरात गजानन कडू कुटुंबासह नातेवाईक आजारी असल्यामुळे बाहेरगावी गेले होते. सोमवारी (ता. दोन) सकाळी ते परत आल्यामुळे घरफोडी झाल्याचे लक्षात आले. घरातील दोन कपाटे व इतर सामान अस्थाव्यस्थ दिसले.

अमरावती : शहरात चोऱ्या, घरफोड्यांचे सत्र थांबलेले नाही. शहरातील अर्जुननगरात एका बंद घराला चोरांनी लक्ष्य केले. येथून 81 हजारांचा ऐवज लंपास केला, तर वलगाव मार्गावरील एक गोदाम फोडून जवळपास 68 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला.

गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील अर्जुननगरात गजानन कडू कुटुंबासह नातेवाईक आजारी असल्यामुळे बाहेरगावी गेले होते. सोमवारी (ता. दोन) सकाळी ते परत आल्यामुळे घरफोडी झाल्याचे लक्षात आले. घरातील दोन कपाटे व इतर सामान अस्थाव्यस्थ दिसले. सोन्याच्या अंगठ्यांसह इतर दागिने आणि रोख रक्कम, असा एकूण 81 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. कडू यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

हेही वाचा - 'जय-विरू'चं अनोख प्रेम! एक बैल हातपंपावर पाणी हापसतो, तर दुसरा पितो

दुसरी घटना नागपुरीगेट ठाण्याच्या हद्दीत घडली. येथील वलगाव मार्गावर मुजीब रहेमान अन्वर हुसेन (वय 31, रा. आझाद कॉलनी) यांच्या मालकीचे विजेच्या उपकरणासह सुटेभाग साठवणुकीचे गोदाम आहे. आतील दोन प्रकारचे ऑइल, विविध प्रकारचे वेगवेगळे सुटेभाग, अशी जवळपास 68 हजार 700 रुपयांची सामग्री चोरीला गेली. मुजीब रहेमान यांच्या तक्रारीवरून नागपुरीगेट पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

हेही वाचा - विवाहितेची कमाल! जिवंत पतीला मृत दाखवून लाटले शासकीय अनुदान अन् केले दुसरे लग्न

४५ ग्रॅम सोन्यासह घरफोडीतील चांदीही जप्त -

गाडगेनगर परिसरात वाढत्या चोऱ्या व घरफोडीच्या घटनांनंतर बऱ्याच दिवसांनी गाडगेनगर पोलिसांनी तीन संशयितांना पकडले. त्यांच्याकडून 45 ग्रॅम सोन्यासह घरफोडीच्या घटनेतील चांदी जप्त केली. या चोरट्यांनी तीन गुन्ह्यांची कबुली दिली.

तिघेही धारणी तालुक्‍यातील मूळ रहिवासी आहेत. श्‍याम अरुण दारसिंभे (वय 20), करण अमान वाडीवाल (वय 22) व संजय सावजी कास्देकर (वय 19), अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. तिघेही राजपूत ढाब्याजवळच्या झोपडपट्टी परिसरात राहत होते. 25 ऑगस्ट ते 18 सप्टेंबर 2020 या कालावधीत तीन घरफोड्या केल्याची कबुली तिघांनी दिली. पोलिसांनी पहिल्या गुन्ह्यातील 25 हजारांची चांदी जप्त केली. चौकशीदरम्यान पुन्हा 30 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, 15 ग्रॅमचा हार, काही रोख रक्कमही जप्त करण्यात आली. तिघेही तीन दिवस गाडगेनगर पोलिसांच्या कोठडीत होते. तिघांकडून शहरातील इतरही ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या गुन्ह्यांत सहभाग असल्याची शक्‍यता पोलिस तपासून पाहत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: thieves stolen one and half lakh rupees in amravati