शेगाव दर्शनाची इच्छा अपूर्णच, तिन मित्रांचा एकाचवेळी मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Three Friends Died

शेगाव दर्शनाची इच्छा अपूर्णच, तिन मित्रांचा एकाचवेळी मृत्यू

अमरावती : कोरोनाचे (Corona) नियम आणखी कडक होण्यापूर्वी एकदा शेगाव (Shegaon) दर्शनाला जाऊयात, असं तिन्ही मित्रांनी ठरवलं. शेगावला जातो, असं कुटुंबीयांना सांगून तिघेही निघाले. शेवटी फोन आला तो त्या तिघांच्याही मृत्यूची बातमी घेऊनच. इतकंच नाहीतर तिघांसोबत त्यांना लिफ्ट मागितलेल्या एका व्यक्तीचाही मृत्यू झाला. शेवटी तिन्ही मित्रांची शेगाव देवदर्शनाची इच्छा अपुरीच राहिली.

हेही वाचा: नवले पुलाखाली पुन्हा अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

...अन् चौघांचाही जागीच मृत्यू -

छायाचिकार विक्की अवघड (वय ३०), आकाश कुकडे (वय २५) दोघेही गुरुकुल कॉलनीतील रहिवासी होते. तसेच एकलासपूर येथील अंकुश दिवटे (वय २८) हा देखील या दोघांचा मित्र होता. तिघानेही शेगावला जाण्याचं ठरवलं. तिघेही अर्टिका वाहनाने १० जानेवारीला सायंकाळी शेगाव दर्शनासाठी निघाले. अंजनगाव स्टँडवर गाडीची वाट पाहत उभे असलेले घनश्याम चावरे यांनी या वाहनाला हात दिला. त्यामुळे विक्कीने गाडी थांबवली आणि त्यांनाही गाडीत बसवून घेतले. पण, अकोट-शेगाव मार्ग येताच रोंदळा फाट्याजवळ खड्डामय रस्त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटलं. वाहनाची झाडाला जबर धडक बसली. अपघात इतका भीषण होता की चौघेही जागीच ठार झाले.

कुटुंबीयांना फोडला हंबरडा -

आकाश कुकडेची वडील एसटी महामंडळात वाहक होते. पण, काही दिवसांपूर्वी ते निवृत्त झाले. त्यांना आकाशसह दोन मुले. आकाश सोमवारी रात्री शेगावला जातो, असं घरी सांगून गेला. तो गावापासून काही अंतरावर पोहोचत नाहीतर वडिलांना त्याच्या मृत्यूची बातमी आली. पण, त्याच्या मृत्यूची बातमी कुटुंबीयांना कशी सांगावी? हे त्यांना समजेना. शेवटी आज सकाळी आकाशच्या मृत्यूची बातमी कळताच कुटुंबीयांनी हंबरडा फोडला.

तिघांच्या मृत्यूची बातमी कळताच तालुक्यावर पसरली शोककळा -

विक्की, आकाश आणि अंकुश तिघेही जीवलग मित्र होते. कुठेही जायचे असल्यास नेहमी सोबत जायचे. पण, यावेळी मात्र काळ तिघांच्याही सोबत नव्हता. तिघांनीही शेगाव दर्शनाचं स्वप्न पाहिलं. पण, गजानन महाजारांचं दर्शन घेण्यापूर्वीच तिघांवरही काळानं झडप घातली. तिघांच्याही मृत्यूची बातमी तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली. तिन्ही मित्र एकाचवेळी गेल्यामुळे तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Amravatiaccident
loading image
go to top