धक्कादायक! राज्यपालांच्या दत्तक तालुक्‍यातील तीन गावे सहा महिन्यांपासून अंधारात 

लीलाधर कसारे 
Saturday, 4 July 2020

10 वर्षांपूर्वी विजेचे खांब टाकण्यात आले. ताराही जोडल्या. विशेष म्हणजे, कंत्राटदाराचे बिलही निघाले. मात्र, वीजपुरवठा करण्यातच आला नाही. वीज पोहोचल्याचा गाजावाजा तेवढा झाला. पिढ्यान्‌ पिढ्या शेकोटीच्या प्रकाशात जगणाऱ्या आदिवासींनीही त्यावेळी वीजेबद्दल फारशी गंभीरता दाखविली नाही. 

भामरागड (जि. गडचिरोली) : नक्षलग्रस्त व राज्यपालांचा दत्तक तालुका अशी ओळख असलेल्या भामरागड तालुक्‍यातील तीन गावे तब्बल सहा महिन्यांपासून अंधारात आहेत. विशेष म्हणजे, या गावांत दहा वर्षांपूर्वी वीजखांब लावून वीजतारा जोडण्यात आल्या होत्या. पण, वीजपुरवठा वर्षभरापूर्वी करण्यात आला. त्यातही आता सहा महिन्यांपासून वीजपुरवठा खंडित असल्याने कुच्चेर, खंडी व नैनवाडी गावातील नागरिकांना अंधारात जगावे लागत आहे. 

शासन-प्रशासन प्रत्येक गावात वीज पोहोचल्याचा गवगवा करीत असले, तरी हा दावा किती भंपक आहे, याच प्रचिती या गावांवरून येऊ शकते. तालुक्‍यातील कुच्चेर, खंडी, नैनवाडी या आदीवासीबहुल गावांत 10 वर्षांपूर्वी विजेचे खांब टाकण्यात आले. ताराही जोडल्या. विशेष म्हणजे, कंत्राटदाराचे बिलही निघाले. मात्र, वीजपुरवठा करण्यातच आला नाही. वीज पोहोचल्याचा गाजावाजा तेवढा झाला. पिढ्यान्‌ पिढ्या शेकोटीच्या प्रकाशात जगणाऱ्या आदिवासींनीही त्यावेळी वीजेबद्दल फारशी गंभीरता दाखविली नाही. पण बदलत्या काळाशी जुळवून घेताना त्यांनाही विजेची गरज भासू लागली. त्यांनी वीज वितरण कंपनीकडे अर्ज-विनंत्या केल्या. 

जाणून घ्या : मध्यरात्री कोविड केअर सेंटरमध्ये माजली खळबळ; काय झाले असे? 

अखेर मागील वर्षी वीजपुरवठ्याची प्रक्रिया सुरू झाली. कंत्राटदारामार्फत पडलेले खांब व तुटलेल्या तारा नीट करण्यात येऊन ट्रान्सफार्मर बसविण्यात आले. बऱ्याच घरांत मीटर बसविले. पुन्हा गाजावाजा करून वीजपुरवठा सुरू करण्यात आला. गावकऱ्यांना आनंद झाला. पण, केवळ आठवडाभरात त्यांच्या आनंदावर विरजण पडले. अवघा आठवडाभर सुरू असणारा वीजपुरवठा अचानक खंडित झाला. या घटनेला सहा महिन्यांचा कालावधी लोटला, तरीही वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला नाही. कुच्चेर, खंडी, नैनवाडी ही अत्यंत दुर्गम व संवेदनशील गावे आहेत. कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वीज आली, पण टिकली नाही. म्हणून वीज वितरण कंपनीच्या कारभारावर नागरिक संतप्त आहेत. गत सहा महिन्यांपासून येथे वीजपुरवठा नाही.परत गावकऱ्यांना शेकोटीचा आधार घेऊन जीवन जगावे लागत आहे. 

आम्ही तीन-चार दिवसांपूर्वी कुच्चेर, खंडी, नैनवाडी परिसरात जाऊन आलो. वीज सुरू करण्याचा खूप प्रयत्न केला; पण वीज चार्ज होत नव्हती. उद्यापासून येथील कामाला प्राथमिकता देणार. पुढच्या आठवड्यात वीज नक्कीच सुरू होईल. 
-पंकज तेली, कनिष्ठ अभियंता 
वीज वितरण कंपनी शाखा, भामरागड 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three villages in the dark