गुरांना जंगलात चराईसाठी नेलेल्या गुराख्यावर वाघाचा हल्ला 

आदिल पठाण
Monday, 9 November 2020

शिवणी येथील गुराखी वामन कवडू ठाकरे हे नेहमीप्रमाणे गुरांना घेऊन चराईकरिता शिवणी जंगल परिसरातील कक्ष क्रमांक ८४१ येथे गेले होते. गुरे चरत असताना वाघाने अचानक त्याच्यावर हल्ला चढविला.

सिंदेवाही (जि. चंद्रपूर) ः जंगलात जनावरांना चराईसाठी घेऊन गेलेल्या गुराख्यावर वाघाने अचानक हल्ला केला. या घटनेत गुराखी जखमी झाला. ही घटना बफरझोन क्षेत्रातील शिवणी येथे घडली. जखमी गुराख्याचे नाव वामन कवडू ठाकरे (वय ५०) असे आहे. त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

शिवणी येथील गुराखी वामन कवडू ठाकरे हे नेहमीप्रमाणे गुरांना घेऊन चराईकरिता शिवणी जंगल परिसरातील कक्ष क्रमांक ८४१ येथे गेले होते. गुरे चरत असताना वाघाने अचानक त्याच्यावर हल्ला चढविला. वामनने जीवाच्या आकांताने आरडाओरड सुरू केली. त्यामुळे वामनसोबत असलेले अन्य गुराखी धावून आले.

घरी सरणाची तयारी अन् मृत महिला अचानक झाली जीवंत; उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप
 

गुराख्यांच्या आरडाओरडीने वाघोबाने तेथून पळ काढला. जखमी गुराखी वामन ठाकरे याला अन्य गुराख्यांनी जंगलामधून बाहेर आणले. त्यानंतर वनविभागाला या घटनेची माहिती देण्यात आली. शिवणीचे वनपरिक्षेत्र अधिकारी भाऊराव तुपे यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रसंगी क्षेत्र सहायक बी. डी. चिकाटे, वनरक्षक सुरेश मेश्राम, लंकेश मेश्राम, विकास तुमराम यांची उपस्थिती होती. 

`मध्ये आलास तर तिला  पेट्रोल टाकून जाळेन`; युवतीच्या भावाला दिली धमकी
 

जखमी वामन कवडू ठाकरे याला सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. जखमी गुराख्याला वनविभागातर्फे तत्काळ तीन हजार रुपयांची मदत देण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी भाऊराव तुपे यांनी दिली. 

संपादन ः राजेंद्र मारोटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A tiger attacks a cowman who is taking cows to graze in the forest