चंद्रपूरच्या झुडपी जंगलात दिसला वाघ; अनेकांची पळापळ 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 डिसेंबर 2019

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा वाघांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. देश-विदेशातील पर्यटक केवळ आणि केवळ वाघोबाच्या दर्शनासाठी ताडोबाला येतात. ताडोबा जंगलात वाघांची संख्या आता वाढली आहे. जागा कमी पडू लागल्याने वाघोबा नवीन जागेच्या शोधात ताडोबा परिसरालगत असलेल्या गावांत फिरत आहेत. चंद्रपूर शहराला लागूनच ऊर्जानगरचा भाग आहे. तेथे झुडपी जंगल, आवडते खाद्य वाघोबाला मिळत आहे. याच कारणामुळे एका वाघोबाने या भागात आपले बस्तान मांडले आहे. 

चंद्रपूर : रविवारी (ता. 15) सकाळच्या सुमारास या मार्गाने ये-जा करणाऱ्यांना हा वाघ दिसला. चंद्रपूर शहराला लागूनच महाऔष्णिक वीज केंद्र आहे. चंद्रपूर ते महाऔष्णिक वीज केंद्राच्या मार्गावर झुडपी जंगल आहे.

याच परिसरातून नाला वाहतो. अस्वल, रानडुक्कर, हरिण, सांबर, चितळ यासह अन्य वन्यप्राण्यांचा या परिसरात नेहमीच वावर असतो. आता त्यात वाघाची भर पडली आहे. वाघोबाला आपले आवडते खाद्य मिळत असल्याने त्याने तिथे आपला मुक्काम ठोकला आहे. 

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल 

जवळपास एक-दीड महिन्यांपासून सातत्याने याच परिसरात वाघ दिसत आहे. पंधरा दिवसांपासून रात्रीच्या सुमारास वाघासोबत त्याच्या बछड्याचे दर्शन अनेकांना झाले होते. त्याचा व्हिडिओही सोशल माध्यमावर व्हॉयरल झाला होता. दिवसाढवळ्या या भागात वाघ दिसत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. शनिवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास वाघ गायीच्या मागे धावत राष्ट्रवादीनगरातील नागमंदिर परिसरात पोहोचला.

हेही वाचा की : 'तो' बिबट्या ठरला अंधश्रद्धेचा बळी

महिलांची आरडाओरड 

तेव्हा याच भागात काही महिला सरपण गोळा करीत होत्या. वाघाला पाहताच महिलांनी आरडाओरड सुरू केली. त्यामुळे वाघोबाने तेथून धूम ठोकली. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी तेथे आले. वनकर्मचाऱ्यांनी फटाके फोडल्याने वाघ दिसेनासा झाला. रविवारी याच परिसरातील झुडपी जंगल जाळण्यात आले होते. त्यामुळे वाघ पळाल्याचे बोलले जात आहे. 

बोर, मोहफुलाच्या प्रेमात पडले अस्वल 

ऊर्जानगरच्या झुडपी जंगलात बोर, मोहफुलाची झाडे मोठ्या प्रमाणावर आहेत. बोर, मोहफूल अस्वलीस मोठ्या प्रमाणावर आवडते. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर अस्वल दिसून येत आहेत. ऊर्जानगरला लागून असलेल्या प्रवेशद्वारावर छोटे उद्यान आहे. याच परिसरात अनेकांना अस्वल दिसून आले. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tiger seen in the shrub forests of Urjanagar at chandrapur