"तो' बिबट्या ठरला अंधश्रद्धेचा बळी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 डिसेंबर 2019

जिल्ह्यातील मांडवा शिवारात गुरुवारी (ता. 12) दोन ते अडीच वर्षीय बिबट्या मृतावस्थेत आढळला होता. विशेष म्हणजे या बिबट्याचे पाय आणि मुंडके गायब होते. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

वर्धा : तालुक्‍यातील मांडवा शिवारात गुरुवारी (ता. 12) आढळलेल्या मृत बिबट्याची शिकार आरोपींनी अघोरी शक्ती प्राप्त करण्यासाठी केली, असे वनविभागाने आतापर्यंत केलेल्या तपासात पुढे आले आहे. या प्रकरणी वनविभागाने आजपर्यंत 11 आरोपींना अटक केली आहे. 

बिबट्याचे पाय व मुंडके गायब 

जिल्ह्यातील मांडवा शिवारात गुरुवारी (ता. 12) दोन ते अडीच वर्षीय बिबट्या मृतावस्थेत आढळला होता. विशेष म्हणजे या बिबट्याचे पाय आणि मुंडके गायब होते. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. बिबट्याच्या मृत्यू प्रकरणात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता. 13) सात आरोपींना अटक केली. या आरोपींकडून मृत बिबट्याचे तीन पाय आणि मुंडके जप्त करण्यात आले आहे. परंतु, बिबट्याचा चौथा पाय अद्यापही वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळालेला नाही. 

 

अवश्य वाचा - मुलीची ममता : आईचा मृतदेह बघताच मुलीनेही घेतला जगाचा निरोप

अघोरी शक्ती प्राप्तीसाठी शिकार 

वनअधिकाऱ्यांनी आज, शनिवारी अटक केलेल्या आरोपींना सोबत घेऊन घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. इतकेच नव्हे, तर आरोपींनी गुन्हा कशा पद्धतीने केला याची माहितीही जाणून घेतली. अटक केलेल्या आरोपींपैकी एकाने अघोरी शक्ती प्राप्त करण्यासाठी संगणमत करून बिबट्याची शिकार केली. शिवाय पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने बिबट्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचाही प्रयत्न केला, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत केलेल्या तपासात पुढे आले आहे. 

 

 लई भारी! - नवलच की! चक्‍क साप खातो कापूस

 

हे आहेत आरोपी 

शुक्रवारी (ता. 13) वनअधिकाऱ्यांनी गोविंद केकापुरे, प्रवीण बुरघाटे, मंगल मानकर, महेश आमझरे, राहुल कासार, रमेश कासार, नरेंद्र कासार या आरोपींना अटक करून त्यांची 15 डिसेंबरपर्यंत वनकोठडी मिळविली आहे. आज, शनिवारी अशोक चाफले, आनंदा चाफले, आनंदा रावेकर आणि राजू कुभेंवार यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या आता अकरावर पोहोचली आहे. 

या वनअधिकाऱ्यांनी केला तपास 

आरोपींना सोबत घेऊन घटनास्थळाची पाहणी करणाऱ्या वनअधिकाऱ्यांमध्ये सहायक उपवनसंरक्षक तुषार डमढेरे, वनपरिक्षेत्र अधिकारी सागर बन्सोड, क्षेत्र सहायक उमेश शिरपूरकर, श्‍याम परडके, रवी राऊत, जाकीर शेख, विनोद सोनवणे आदींची उपस्थिती होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "That leopard` became a victim of superstition

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: