
वऱ्हाड्यांवर कोसळले टिनाचे छत
दर्यापूर (जि. अमरावती) - मूर्तिजापूर मार्गावरील वैभव मंगल कार्यालयाचे टिनाचे छत कोसळले. त्यामुळे चांगलीच तारांबळ उडाली. या घटनेत ५०च्या वर वऱ्हाडी जखमी झाले. त्यापैकी १२ गंभीर जखमींना अमरावती येथील इर्विन रुग्णालयात, तर अन्य जखमींना दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी (ता. १) दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, येथील वैभव मंगल कार्यालयात दोन वेगवेगळ्या परिवारांचे लग्न सुरू होते. वादळवाऱ्यामुळे या मंगल कार्यालयावरील टिनपत्रे उडाले. सदर टिनपत्रे सुरू असलेल्या लग्नसोहळ्याच्या ठिकाणी येऊन पडल्याने ४८ वऱ्हाडी जखमी झाले आहे. त्यापैकी १२ जण गंभीर जखमी झाले. दुचाकी व चारचाकींचेसुद्धा मोठे नुकसान झाले. या मंगल कार्यालयात आज अंजनगावबारी येथील अंभोरे परिवार व दर्यापूर येथील सोळंके परिवार यांच्याकडील लग्नसोहळे आयोजित केले होते. त्याकरिता शेकडो वऱ्हाडी उपस्थित होते. दुपारी साडेतीनदरम्यान जेवणावळी सुरू होत्या.
यादरम्यान दर्यापूरमध्ये आलेला जोरदार पाऊस व वादळवाऱ्यामुळे मंगल कार्यालयावरील टिनपत्रे उडाले. यासह मंगल कार्यालयाच्या भिंतीच्या विटासुद्धा काही जणांच्या अंगावर पडल्या. सदर टिनपत्रे उडून कार्यालयातच पडल्याने ५० च्या वर वऱ्हाडी जखमी झाले. या प्रकारामुळे सदर लग्नसोहळ्यामध्ये एकच धावपळ उडाली. सर्वच जण वाट दिसेल तिकडे पळत होते. काही वेळानंतर वादळ शांत झाल्याने व पाऊस थांबल्याने जखमींना प्रथमोपचार देण्यात आले. यासह गंभीर जखमींना अमरावती येथील इर्विन रुग्णालयात, तर किरकोळ जखमींना दर्यापुरातील खासगी तथा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गंभीर जखमींची नावे
मंगल कार्यालयाचे टिनशेड उडाल्यामुळे गंभीर जखमी झालेल्यांमध्ये सुरेंद्र सोळंके (वय ४०), मालू खंडारे (वय ६५), पांडुरंग तेलखेडे (वय ६५), पवन साखरे (वय १९), अंकित ठाकरे (वय १८), बिट्टू कांबळे (वय ५), श्रीकृष्ण डाबेकर (वय ६०), देवीदास पोटफोडे (वय ६०), चरणदास ठाकरे (वय ५५), श्रीकांत काळबांडे (वय २४), नवल ठाकरे (वय १९) आदींचा समावेश आहे.
Web Title: Tina Roof Collapses On Brides At Murtijapur Road Amravati
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..