भरधाव कारचा टायर फुटला अन्‌ तिघांचा जीव गेला

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 23 June 2020

रविवारी (ता. 22) दुपारी तीन वाजताच्या सुमारास हे तिघेजण आपल्या चारचाकी वाहनाने चंद्रपूरकडे जात होते. मांगली (दे.) गावाजवळ वाहनाचा टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.

वरोरा (जि. चंद्रपूर)  : चंद्रपूरकडे येत असलेल्या एका वाहनाचा अचानक टायर फुटला आणि अनियंत्रित झालेले भरधाव वाहन रस्ता दुभाजक ओलांडून रस्त्याच्या कडेला उलटले. या भीषण अपघातात वाहनातील तिघांचा मृत्यू झाला. ही घटना नागपूर- चंद्रपूर महामार्गावरील मांगली (दे.) गावाजवळ घडली. 

सुनीलकुमार अग्रवाल, सिद्धेश्‍वर पंढरीनाथ प्रभूसाळगावकर आणि दशरथ पट्टे अशी मृतांची नावे आहेत. रविवारी (ता. 22) दुपारी तीन वाजताच्या सुमारास हे तिघेजण आपल्या चारचाकी वाहनाने चंद्रपूरकडे जात होते. मांगली (दे.) गावाजवळ वाहनाचा टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहन महामार्गावरील दुभाजक ओलांडून दुसऱ्या रस्त्याच्या कडेला कोसळले.

अवश्य वाचा- तीन महिन्यांची गर्भवती माहेरी आली अन् लोटा घेऊन शौचास गेली, पुढे...

या भीषण अपघातात वाहनाचा चेंदामेंदा झाला. वाहनातील सिद्धेश्‍वर पंढरीनाथ प्रभूसाळगावकर व दशरथ पट्टे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वरोरा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. जखमी सुनील अग्रवाल याला तातडीने उपचारार्थ हलविण्यात आले. पण वाटेतच त्याचा मृत्यू झाला. घटनेचा तपास वरोरा पोलिस करीत आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A tire of a car exploded due to which three persons killed