अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक : प्रचार तोफा थंडावल्या, काउंटडाऊन सुरू

सुरेंद्र चापोरकर
Sunday, 29 November 2020

मतदारसंघात 35 हजार 622 मतदार असून त्यामध्ये 26 हजार 60 पुरुष व 9 हजार 562 स्त्रियांचा समावेश आहे. प्रमुख राजकीय पक्षांनी या निवडणुकीत आपले उमेदवार उतरविल्याने निवडणुकीतील चुरस चांगलीच वाढली आहे. 

अमरावती : आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्यांनी यंदा गाजलेल्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारतोफा रविवारी (ता. 29) थंडावल्या. आता प्रत्यक्ष मतदानाला काही तासच शिल्लक राहिले असून 27 उमेदवारांच्या भाग्याचा निर्णय 35 हजार 622 मतदारांच्या हाती आहे. मंगळवारी (ता.1) मतदान, तर 3 डिसेंबरला मतमोजणी होईल. 

हेही वाचा - आता हेल्मेट आणि कॉलेजबॅग बाळगणारे असणार पोलिसांच्या रडारवर; चेनस्नॅचिंगच्या घटना...

मतदारसंघात 35 हजार 622 मतदार असून त्यामध्ये 26 हजार 60 पुरुष व 9 हजार 562 स्त्रियांचा समावेश आहे. प्रमुख राजकीय पक्षांनी या निवडणुकीत आपले उमेदवार उतरविल्याने निवडणुकीतील चुरस चांगलीच वाढली आहे. 77 मतदान केंद्रांवर 348 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती राहणार आहे. 3 डिसेंबरला सकाळी 8 पासून अमरावतीच्या विलासनगर परिसरातील शासकीय गोदामात मतमोजणी होणार आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जिवाचे रान केले. मतदारसंघाची व्याप्ती विभागस्तरीय असल्याने त्यांची चांगलीच दमछाक झाली. रविवारी अधिकृतपणे प्रचार थंडावला असला तरी उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रत्यक्ष भेटीने तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे यंदा या मतदारसंघात केवळ 35 हजारच मतदार असल्याने सर्वच उमेदवारांचे 'हार्टबिट' वाढले आहेत. मागील निवडणुकीत मतदारांची संख्या 44 हजारापर्यंत होती हे विशेष. 

हेही वाचा - तब्बल २२ वर्षानंतरही कर्मचाऱ्यांना नाही संगणकाचे ज्ञान...

जिल्हानिहाय मतदारसंख्या -
अमरावती 10 हजार 386, अकोला 6480, वाशिम 3813, बुलडाणा 7484, यवतमाळ 7459, एकूण 35 हजार 622. अमरावती जिल्ह्यात मतदारांची संख्या सर्वाधिक म्हणजे 10 हजार 386 असून सर्वांत कमी मतदार वाशिम जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे सर्वच उमेदवारांच्या नजरा अमरावतीच्या मतदारांकडे लागल्या आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: today is last of campaign in amravati teacher constituency election