टप-टप बंद : घोडागाडीच्या व्यवसायाला अखेरच्या उचक्‍या 

file photo
file photo
Updated on

अचलपूर(अमरावती) : एकेकाळी प्रवासी वाहतुकीसाठी प्रतिष्ठेचे साधन मानल्या जाणाऱ्या टांग्यात आज कुणीही बसण्यास तयार नाही. टांग्यांची जागा ऑटोरिक्षाने घेतल्यामुळे अनेक कुटुंबांचा रोजगार हिरावला. परिणामी टांगा व्यवसाय आता अखेरच्या  उचक्‍या घेत आहे. 
पूर्वी रेल्वेस्थानक आणि बसस्थानकावरून गावात जाण्यासाठी टांगा हाच एकमेव पर्याय होता. त्यावेळी शहरासह ग्रामीण भागात जवळपास चारशे टांगागाड्या होत्या. आता मात्र केवळ तीन टांगे शिल्लक आहेत. आजही ते टांग्याच्या माध्यमातून आपला संसाराचा गाडा हाकत आहेत. पूर्वी अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती टांग्यात बसूनच प्रवास करीत होते. आता ते चकाचक चारचाकी गाड्यांत फिरू लागले आहेत. वाढत्या महागाईचा फटका टांगा व्यवसायाला बसला आहे. घोड्यांच्या किंमती झपाट्याने वाढत असल्याने टांगा व्यवसायाला घरघर लागली आहे. सोबतच घोड्यासाठी लागणारे खाद्यान्न महागल्याने त्यांची निगा राखणे खर्चिक झाले आहे. पूर्वी तीनशे रुपयांत तयार होणारा टांगा आज लाख रुपये देऊनसुद्धा मिळत नाही. टांग्याची दुरुस्ती करणारे कारागीरही नाहीत. त्यामुळे अनेक टांगा व्यावसायिकांनी इतर व्यवसायाकडे वळणे पसंत केले आहे. 

टांगा आउट, घोडा इन 
आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात टांगा आउट झाला असून घोडा मात्र आजही दिसून येत आहे. लग्नकार्यात नवरदेवाच्या मिरवणुकीसाठी घोड्याचा वापर होत आहे. त्यामुळे नाचणाऱ्या घोड्यांची मागणी काही प्रमाणात वाढली आहे. यासाठी प्रशिक्षित घोड्यांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. 

चांदूररेल्वेमध्ये तिसरी पिढी 
चांदूररेल्वे : शहरातील टांगा व्यावसायिकांची ही तिसरी पिढी आहे. सध्या येथे जवळपास 25 ते 30 टांगा व्यावसायिक आहेत. सुरुवातीला दोन रुपये असलेली सवारी आजही केवळ पाच रुपयांपर्यंतच वाढली आहे. आम्हाला हाच व्यवसाय पुढेही चालवायचा असल्याचे टांगाचालक सांगतात. लॉकडाउनमुळे रेल्वे आणि बस बंद असल्याने आमच्या व्यवसायाला चांगलाच फटका बसला असल्याचे मत टांगा चालक शेख फिरोज अब्दुल जब्बार यांनी व्यक्त केले. 

गेल्या तीस वर्षांपासून टांगा व्यवसाय करीत आहे. आज रिक्षांची संख्या वाढली, पर्यायी वाहतूक उपलब्ध झाल्याने घोडागाडीकडे सर्वसामान्य प्रवाशांनी पाठ फिरविली आहे. त्यामुळे अनेकांना पर्यायी व्यवसायाकडे वळावे लागले आहे. 
-रमेश आमटे, टांगेवाले, धोतरखेडा. 

सजवलेल्या टांगा, उंच रुबाबदार घोडा, पायात वाजणारे घुंगरू या साऱ्याच गोष्टी आता केवळ आठवणीपुरत्याच शिल्लक राहिल्या आहेत. वेळेचा अभाव व पैशाची आवक वाढल्याने टांगे नामशेष झाले आहेत. आता केवळ आठवणी राहिल्या आहेत. 
-दिवाकर सोनार, नागरिक, धोतरखेडा. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com