पूर्व विदर्भातील पर्यटन विकास निधीला कात्री

राजेश रामपूरकर
गुरुवार, 3 मे 2018

विकासकामे प्रभावित - १३४ कोटींपैकी फक्त ६० कोटींचा निधी मिळाला 
नागपूर - पूर्व विदर्भातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला गेल्या दोन वर्षांत १३४ कोटी निधीपैकी फक्त ५९ कोटी ६४ लाखांचा निधी मिळाला. राज्य सरकारच्या ३० टक्के निधी कपातीच्या निर्णयाचा फटका पूर्व विदर्भातील पर्यटन केंद्रांच्या विकासाला बसल्याचे आकडेवारीवरून उघड झाले आहे. 

विकासकामे प्रभावित - १३४ कोटींपैकी फक्त ६० कोटींचा निधी मिळाला 
नागपूर - पूर्व विदर्भातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला गेल्या दोन वर्षांत १३४ कोटी निधीपैकी फक्त ५९ कोटी ६४ लाखांचा निधी मिळाला. राज्य सरकारच्या ३० टक्के निधी कपातीच्या निर्णयाचा फटका पूर्व विदर्भातील पर्यटन केंद्रांच्या विकासाला बसल्याचे आकडेवारीवरून उघड झाले आहे. 

संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटनेच्या ‘शाश्‍वत पर्यटन एक विकासाचे साधन’ या घोषवाक्‍याला अनुसरून विदर्भातील पर्यटनाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात  आहे. त्यासाठी दोन वर्षांपासून अर्थसंकल्पातील पर्यटन विकासाच्या निधीतही वाढ केली आहे.

२०१६-१७ या वर्षात ८२ कोटी ५४ रुपये मंजूर केला होता. परंतु, त्यातून फक्त ५१ कोटी ६८ लाखांचा निधी मिळाला. नागपूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी ४२ कोटी ११ लाखाचा निधी मंजूर केला होता.

त्यातील सहा कोटी ६३ लाखांचा निधीच मिळाला होता. आंभोरा येथील स्थळांचा विकास, वडोदा, सेलू, चिखली, मौदा, चिरवा, धरमपुरी, गोवारी येथील  तलावांचे सौंदर्यीकरण व जलतरण क्रीडा केंद्राचा विकास करण्यात आला. तसेच एमटीडीसीच्या प्रादेशिक कार्यालयाच्या पायाभूत सुविधांचे अत्याधुनिकीकरण, हिंगणा तालुक्‍यातील रायपूर, वेणा नदी येथील पर्यटन विकास व सौंदर्यीकरण, सती अनसूया माता संस्थान पारडसिंगा, कामठी तालुक्‍यातील धानला येथे तलावाचे सौंदर्यीकरण व जलतरण क्रीडा केंद्राचा विकास करण्यात  आला.  हिंगणा तालुक्‍यातील वेणा नदी येथील पर्यटन विकास व सौंदर्यीकरणासाठी ४ कोटी ७७ लाख रुपयांचा निधी वितरित केला आहे. 

वर्धा जिल्ह्यासाठी १८ कोटी ५३ लाखांचा निधी अर्थसंकल्पात मंजूर झाला होता. त्यापैकी फक्त २ कोटी ६५ लाखांचा निधी मिळाला. त्यात बोर धरण येथील पर्यटन संकुलाचा विकास करणे तसेच भंडारा जिल्ह्यातील २ कोटी ७६ लाख पैकी फक्त ४० लाखांचाच निधी वितरित केला आहे. चंद्रपूर जिल्ह्याला ११ कोटी २५ लाखांच्या निधीची तरतूद केली होती. त्यातील फक्त १ कोटी ८५ लाखांचा निधीच वितरित केला. त्यातुलनेत २०१७-१८ या वर्षातील निधीमध्ये ३० टक्के कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने त्याचा फटका पूर्व विदर्भातील पर्यटन क्षेत्र विकासाला बसला आहे. नागपूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकासासाठी ७ कोटी ८५ लाखांचा निधी मंजूर केला होता. त्यातील फक्त १ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी वाटप केला. त्यात कऱ्हांडला निसर्ग पर्यटन केंद्र विकासासाठी सर्वाधिक १ कोटीचा निधी दिला आहे.

भंडाऱ्याला फक्त एक कोटी १० लाख
वर्धा जिल्ह्यासाठी २१ कोटी ५७ लाखांच्या मंजूर निधीपैकी २ कोटी ५३ लाख रुपये वितरित करण्यात आले. भंडारा जिल्ह्याला ६ कोटी ६६ लाखांपैकी १ कोटी १० लाखांचा निधी वितरित केला आहे. गोंदिया जिल्ह्यातील ५ कोटी ७८ कोटींपैकी ७० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्यातून विकासकामे केली जात आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tourism development fund