पर्यटन विकासातून चांदपूरला लागावे ‘चारचांद’; सुविधांअभावी हिरमोड

पर्यटन विकासातून चांदपूरला लागावे ‘चारचांद’; सुविधांअभावी हिरमोड
Updated on

भंडारा : निसर्गसौंदर्याने समृद्ध असलेला पूर्व विदर्भातील आणखी एक महत्त्वाचा जिल्हा म्हणजे भंडारा. तलावांचा प्रदेश म्हणून ओळख असलेल्या या भागात पर्यटनस्थळेही मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु, स्थानिक लोकप्रतिनिधींची उदासीनता म्हणा किंवा प्रशासनाचे दुर्लक्ष वर्षानुवर्षांपासून साध्या साध्या सुविधांअभावी हा भाग दुर्लक्षित आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास सिहोरा परिसरातील चांदपूर टेकडीचे देता येईल. देवदर्शनासोबत पर्यटन असा दुहेरी आनंद देणारे हे स्थळ आहे. परंतु, साध्या साध्या सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांची निराशा होते. ग्रीन व्हॅली चांदपूर येथील हनुमानाच्या दर्शनासाठी भाविक दूरदूरून येतात. निसर्गरम्य परिसर असल्याने पर्यटनस्थळ म्हणूनही येथे अनेक जण भेट देतात.

विदर्भच नव्हे तर संपूर्ण राज्यातून येणाऱ्या भक्तांसाठी विश्रामगृह, चांगले हॉटेल्स आदी सुविधा असणे गरजेचे आहे. येथील रमणीय जलाशयातील नौकाविहार बंद असल्याने पर्यटक व नागरिकांची निराशा होते. रमणीय स्थळ असतानाही पर्यटकांना मनमुराद आनंद लुटता येत नाही. त्यामुळे बंद असलेले नौकाविहार (बोटिंग) सुरू करावे. यामुळे पर्यटकांच्या सुविधेसोबत रोजगारनिर्मिती होऊन बेरोजगारांना काम मिळेल. जिल्हा प्रशासन, संबंधित विभाग, पर्यटन विकास महामंडळ व पाटबंधारे विभागाने पर्यटकांच्या मागणीनुसार त्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे. नौका विहाराबाबत अधिकृतरीत्या निविदासुद्धा काढण्यात याव्या, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. लोकप्रतिनिधींनी या महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष देऊन नागरिकांना दिलासा देणे त्यांचे कर्तव्य आहे.

ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटनस्थळ राजकीय इच्छाशक्तीअभावी दुर्लक्षित आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध करणारे हे पर्यटनस्थळ आहे. शासनाच्या लालफितशाहीत पर्यटनस्थळचा विकास रखडला. पर्यटनस्थळ महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला हस्तांतरित करण्यात आले. परंतु या पर्यटनस्थळात अद्याप विकासाचा सूर्योदय झालाच नाही. पर्यटनस्थळ परिसरात विश्रामगृहाचे बांधकाम सुरू आहे. यामुळे विकासाचे एक पाऊल पुढे पडणार असले तरी जलद गतीने निधी खेचून आणणे गरजेचे आहे.

पर्यटन विकासातून चांदपूरला लागावे ‘चारचांद’; सुविधांअभावी हिरमोड
मुलांच्या जाण्याने आई-वडिलांनी तर पतीच्या जाण्याने बायकांनी फोडला टाहो

जलाशयाअंतर्गत नहरांची कामे अडली

चांदपूर जलाशयाअंतर्गत बारा हजार हेक्टर आर. शेती ओलिताखाली आणणाऱ्या चांदपूर जलाशयाच्या कामावर गेल्या अनेक वर्षांपासून निधी खर्च केलेला नाही. जलाशयातील गाळ रोजगार हमी योजनेअंतर्गत काढण्याची ओरड होते; परंतु कुणीही ऐकायला तयार नाही. वाढत्या गाळामुळे जलाशयाची साठवणक्षमता कमी झाली. येथील ब्रिटिशकालीन शिकारा शंभर वर्षांपूर्वीचा आहे. शिकाऱ्याची दुरुस्ती झाली नसल्याने केव्हा धोका होईल याचा नेम नाही. शासनाने सिंचन प्रकल्पाच्या समस्या निकाली काढण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

स्थिरीकरण योजनेचे काय?

बावनथडी नदीचे पात्र बारमाही वाहणारे नाही. उन्हाळ्यात सोंडाटोला उपसासिंचन प्रकल्पातून पाण्याचा उपसा होत नाही. वैनगंगा नदीच्या पात्रात बारमाही पाणी राहते. त्यामुळे माजी आमदार चरण वाघमारे यांनी बपेरा-चांदपूर स्थिरीकरण योजनेच्या मंजुरीचा प्रस्ताव सादर केला. ही योजना चांदपूर जलाशयाला बारमाही पाणी पुरविणारी असून, योजनेला शासनाने मंजुरी दिल्यास रोटेशन पद्धतीला पूर्णविराम मिळेल. या दिशेने भरीव प्रयत्न झाले पाहिजे. यामुळे १२ हजार हेक्टर आर. शेती बारमाही ओलिताखाली येईल.

चांदपूर पर्यटनस्थळासंबंधी व्यवस्थित नियोजन केल्यास रोजगार निर्मिती होण्यास मदत होऊ शकते. तसेच सोंड्याटोला उपसासिंचन योजनेचे चांगले नियोजन केल्यास ४७ गावांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो. याकरिता प्रत्येक गावातून एक प्रतिनिधी निवडून कमिटी तयार करावी. जेणेकरून तेथील कामावर, पाण्यावर नियंत्रण ठेवता येईल.
- इंजि. उमेश्वर कटरे, सरपंच मोहगाव (खदान)
चांदपूर पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास आले असले तरी येथे पाहिजे तसा विकास झालेला नाही. ब्रिटिशकालीन चांदपूरला मोठे जलाशय असून, शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी मोठा निधी खेचून आणण्याची स्थानिक लोकप्रतिनिधींची इच्छाशक्तीच नाही. सिहोरा परिसरातील शेतकरी-शेतमजूर व बेरोजगारांना रोजगार मिळेल यादृष्टीने शासनाने सोंड्याटोला उपसासिंचन प्रकल्पाकडे लक्ष दिले तर चांदपूर पर्यटनस्थळाचे महत्त्व वाढेल.
- सुभाष बोरकर, तालुकाध्यक्ष, भाजप किसान आघाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com