esakal | पश्‍चिम विदर्भ लॉकडाऊनच्या दिशेने; पाच नगरपालिका क्षेत्रात संचारबंदी
sakal

बोलून बातमी शोधा

Towards West Vidarbha Lockdown Curfew in five municipal areas

प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर क्षेत्रातील दुकाने दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू राहणार आहेत. लॉकडाउनच्या अंमलबजावणीला आज, सोमवारी रात्री ८ वाजतापासून संचारबंदीने सुरुवात झाली. 

पश्‍चिम विदर्भ लॉकडाऊनच्या दिशेने; पाच नगरपालिका क्षेत्रात संचारबंदी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अमरावतीच्या विभागीय आयुक्तांनी विभागातील पाचही जिल्ह्यांत सुधारित प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार मंगळवारी सकाळपासून अमरावती महानगर पालिका क्षेत्र, अचलपूर शहर, अकोला जिल्ह्यातील अकोला महानगर पालिका क्षेत्र, अकोट व मूर्तिजापूर नगरपालिका क्षेत्र तसेच बुलडाणा जिल्ह्यातील बुलडाणा, खामगाव, देऊळगावराजा, मलकापूर आणि चिखली नगरपालिका क्षेत्रांत आठ दिवसांसाठी, म्हणजे १ मार्चच्या सकाळपर्यंत पूर्णतः संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. 

अमरावती जिल्हा गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने बैठक घेऊन प्रतिबंधात्मक आदेश लागू केले. त्यानुसार अमरावती व अचलपूर शहरात सोमवारी सायंकाळपासून एका आठवड्यासाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आठवडाभर कुठल्या गोष्टींची उणीव भासू नये यासाठी नागरिकांनी आज सकाळपासूनच बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी केली होती. शहरातील सर्व रस्त्यांवर नागरिकांची तोबा गर्दी पाहायला मिळत होती. सोमवारी जिल्ह्यात कोरोनाचे ६७३ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे १ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात एकूण आठ हजार १४४ कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आलेत. 

अकोलाचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अकोला महानगरपालिका क्षेत्रासह अकोट व मूर्तिजापूर नगरपालिका क्षेत्रामध्ये उद्या, मंगळवारी सकाळी ६ वाजतापासून ते १ मार्चच्या सकाळी ८ वाजेपर्यंत पूर्णतः लॉकडाउन जाहीर केला आहे. तिन्ही प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये केवळ जीवनावश्यक वस्तूची दुकाने सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत.

इतर सर्व दुकाने लॉकडाउन काळात बंद राहणार आहेत. प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर क्षेत्रातील दुकाने दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू राहणार आहेत. लॉकडाउनच्या अंमलबजावणीला आज, सोमवारी रात्री ८ वाजतापासून संचारबंदीने सुरुवात झाली. 

बुलडाणा जिल्ह्यातही लॉकडाऊन

बुलडाणा जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने बुलडाणा, खामगाव, चिखली, देऊळगाव राजा आणि मलकापूर या पाच नगरपालिका क्षेत्रांमध्ये पुन्हा पूर्णतः संचारबंदी जाहीर केली आहे. ही संचारबंदी आज, सोमवारी सायंकाळी पाच वाजतापासून ते १ मार्चच्या सकाळी आठ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. जीवनावश्‍यक वस्तूंना निर्धारित वेळेत वाटप करण्याव्यतिरिक्त इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे सर्व शाळा महाविद्यालय शैक्षणिक संस्था प्रशिक्षण संस्था शिकवणी वर्ग व्यायामशाळा बंद राहणार आहेत. बँकांनाही मर्यादित कर्मचारी संख्येत कामकाज करण्याचे निर्देश दिले आहेत. 

शेगावचे गजानन महाराज मंदिर पुन्हा बंद

कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने शेगाव येथील संत गजानन महाराजांचे मंदिर रविवारी, २१ फेब्रुवारीच्या रात्रीपासून पुढील आदेशापर्यंत भाविकांना दर्शनासाठी पुन्हा बंद करण्यात आले आहे. मागील वर्षी कोरोनामुळे १७ मार्च रोजी श्रीं चे मंदिर बंद करण्यात आले होते. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर परत १७ नोव्हेंबर २०२० पासून शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार व ई पासद्वारे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले होते. 

दोन लग्नसमारंभावर कारवाई

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने रविवारी (ता.२१) पोलिसांनी दोन लग्नसमारंभाच्या ठिकाणी प्रत्येकी दहा हजार रुपये दंड केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात रविवारी बायपास रोडवरील साई मंगल कार्यालयात लग्न सोहळ्यात दहा हजार रुपयांचा दंड करण्यात आला, तसेच मानोरा रोडवरील एका लग्नाच्या स्वागत समारोहावर सुद्धा कारवाई करून दहा हजार रुपये दंड करण्यात आला.

loading image