परसोडी (नाग) गावातील पुरातन नाग मंदिराविषयी आहे ही श्रद्धा

nag final
nag final

लाखांदूर (जि. भंडारा) : प्रत्येक गावाला पुरातन इतिहास असतो.गावाचे काहीतरी वेगळेपण असते. तिथल्या गावकऱ्यांच्या श्रद्धा असतात आणि काही परंपराही असतात. काही आख्यायिकाही असतात. आणि तिथले गावकरी त्या परंपरा आणि आख्यायिकाही प्राणपणाने जपत असतात. परसोडी गावालाही असेच एक पुरातन नाग मंदिर आहे. त्या मंदिराचा इतिहास आहे. आणि त्याची एक कहाणीही आहे.

माणूस विज्ञान युगात जगत असला तरी काही प्रथा-परंपरा आजही जपल्या जातात. तालुक्‍यातील परसोडी (नाग) येथील नागमंदिरात शनिवारी नागपंचमीच्या दिवशी विशेष महापूजा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्पदंश झालेल्या व्यक्तीने या गावाच्या सीमेत प्रवेश केल्यास त्याच्या अंगातील विष उतरते अशी भाविकांची श्रद्धा आहे.

प्राचीन काळापासून परसोडी येथे नागमंदिर आहे. भाविकांच्या श्रद्धेनुसार सर्पदंश झालेल्या व्यक्तीला येथील नागमंदिरात दर्शनासाठी आणले जाते. याशिवाय शेतात काम करताना सापाचा दंश झाल्याची भीती बाळगणारेसुद्धा येथे मंदिरात येऊन पूजा करतात. त्यानंतर विषाचा कोणताही प्रभाव राहात नाही, अशी भाविकांची श्रद्धा आहे. नागपंचमीला परिसरातील हजारो नागभक्त दर्शन घेऊन नारळ अर्पण करतात. यात सर्वाधिक संख्या शेतकऱ्यांचीच असते. या मंदिराबाबत गावकऱ्यांचीही श्रद्धा आहे. नागपंचमीच्या दिवशी सर्व भाविक या मंदिरात दर्शन व प्रसाद घेतात. यादिवशी शेतातील सर्व कामे वर्ज्य असतात. आणि नवस फेडण्यासाठी दूरवरून भाविक मंडळी कुटुंबासह या मंदिरात येतात. इथले गावकरी येणाऱ्या भाविकांच्या सोय करतात.

नागमंदिराबाबत आख्यायिका
वयोवृद्ध गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार, जुन्या काळी शेतात नवऱ्याची शिदोरी घेऊन जात असलेल्या महिलेला एक मोठ्या नागाने आवाज देऊन प्राण वाचवण्याची विनंती केली. गारुडी त्या नागाला शोधत होते. परंतु, नगाच्या दंशामुळे आपला जीव जाईल म्हणून महिला घाबरत होती. तेव्हा तो नाग अत्यंत लहान स्वरूपात समोर आला. शेतकऱ्याच्या बायकोने त्याला आपल्या ओटीत लपवून ठेवले. तेथे आलेल्या गारूड्यांनी तिला नागाविषयी विचारपूस केली. परंतु, महिलेने नाग दिसलाच नाही असे सांगितले. गारुडी निघून गेल्यावर महिलेने नागदेवाला बाहेर काढले. त्यावेळी त्या नागाने तू माझा जीव वाचविल्यामुळे यापुढे या भागात मी कोणालाही दंश करणार नाही असे वचन दिले. तसेच या ठिकाणी येणाऱ्या व्यक्तीच्या अंगातील विषाचा प्रभाव कोणतेही औषध न घेता कमी होईल. त्यामुळे जिल्ह्यात कुठेही सर्पदंश झाला तरी, शेतकरी परसोडीच्या नागमंदिरात पूजा करण्याचा नवस बोलतात. त्यामुळे नागदेवाच्या कृपेने जीव वाचतो, असे भाविक सांगतात.

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com