पंचक्रोशी प्रदक्षिणेची परंपरा राहिली कायम,  पावणेदोनशे वर्षांचा इतिहास

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 July 2020

विदर्भाची प्रती पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र घोराड येथे अखेर आषाढी एकादशीला निघणारी पंचक्रोशी प्रदक्षिणा पूर्ण झाली.

हिंगणी (जि.वर्धा) : विदर्भाची प्रती पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र घोराड येथे अखेर आषाढी एकादशीला निघणारी पंचक्रोशी प्रदक्षिणा पूर्ण झाली. यामुळे पावणेदोनशे वर्षाचा इतिहास जपण्यात देवस्थानच्या व्यवस्थापकांना यश आले. पहाटेपासून सकाळी सात वाजेपर्यंत भाविकांनी पायरीचे दर्शन घेतले. मंदिरात महापूजा करण्यात आली. यानंतर प्रदक्षिणा पूर्ण करण्यात आली. 

यानंतर पाच ते सहा वारकऱ्याच्या उपस्थितीत सकाळी आठ वाजता पंचक्रोशी प्रदक्षिणा करण्यास दिंडी निघाली. दोन किमी अंतराची असणारी ही प्रदक्षिणा टाळ-मृदंग निनादत माउली माउलीच्या जयघोषात सामाजिक अंतर ठेवत पूर्ण करण्यात आली. कोरोनामुळे मंदिर उघडण्याची परवानगी व दिंडीची परवानगी प्रशासनाने नाकारल्यानंतर गाव पातळीवर दोन दिवसांची संचारबंदी जाहीर केल्याने भाविकांना माउलीचे दर्शन दुरापास्त झाले. 

वाचा :- "आई प्लीज... तो बलात्कार नव्हे... प्रेम आहे आमचे' 

गावातील व परिसरातील भाविकांना माउलीच्या दर्शनाची असलेली आस मात्र कायम राहिली. तर दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना पोलिस बंदोबस्तामुळे पायरीवरही माथा टेकविता आला नाही. पण, परिसरात येऊन दुरूनच पायरीचे दर्शन घेता आले. पोलिस बंदोबस्त असल्यामुळे बहुतांश भाविकांनी घरीच माउलीची पूजा करून एकादशीची परंपरा कायम ठेवली. पंचक्रोशी प्रदक्षिणा झाल्याने संतांनी सुरू केलेली ही धार्मिक परंपरा खंडित झाली नसल्याचा आनंद भाविकांमध्ये दिसत होता. 

वारकऱ्यांची 22 दिवस प्रदक्षिणा 
घोराड ते पंढरपूर जाणारी दिंडी ही आळंदीवरून माउलीच्या पालखी सोहळ्यात सामील होत असते. या दिंडीचे हे सोळावे वर्ष होते. पण, दिंडी सोहळाच रद्द झाल्याने या दिंडीतील काही वारकऱ्यांनी 22 दिवस सकाळी व सायंकाळी मंदिर परीकोटला प्रदक्षिणा घालून 22 दिवस चालणारी पायदळ वारी पंढरीत नाही तर प्रती पंढरपुरात पूर्ण करून वारीची परंपरा कायम ठेवली. 

टाकळी येथील वयोवृद्ध वारकरी दशरथ चंदनखेदे यांनी मंदिर परिसरात वटवृक्षाच्या झाडाखाली बसून माउलीच्या भक्तीत तल्लीन झाले होते. पोलिसांनी या परिसरात भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून विशेष काळजी घेत भाविकांनी सहकार्य केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The tradition of Panchkrushi Pradakshina remained