esakal | वर्धा शहरातून "श्रमिक ट्रेन'ने हजारावर मजूर स्वगृही रवाना 
sakal

बोलून बातमी शोधा

Wardha Train

कोरोनाच्या प्रतिबंधाकरिता देशात व राज्यात लॉकडाउन झाल्यामुळे अनेक कामगार व इतर व्यक्ती जिल्ह्यात अडकले. यातील अनेक मजूर कंपनी, जिनिंग मिल, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि रस्ता बांधकामावर काम करीत होते. कामे ठप्प झाल्यामुळे मजुरांची व्यवस्था प्रशासनाच्या माध्यमातून संबंधित कंपन्यांनी व कंत्राटदारांनी केली होती.

वर्धा शहरातून "श्रमिक ट्रेन'ने हजारावर मजूर स्वगृही रवाना 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वर्धा  ः लॉकडाउनमुळे जिल्ह्यात अडकलेले बिहारमधील 700 मजूर व चंद्रपूर जिल्ह्यातून स्वगावी जाण्यासाठी येथे आलेले मजूर यांच्याकरिता आज, बुधवारचा दिवस विशेष ठरला. या मजुरांना स्वगावी घेऊन जाणारी विशेष "श्रमिक ट्रेन' वर्धेतून पाटण्यासाठी रवाना झाली. या गाडीत एकूण एक हजार 19 प्रवासी होते. दुग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा पालकमंत्री सुनील केदार आणि खासदार रामदास तडस यांनी रेल्वेगाडीला हिरवी झेंडी दाखवून मजुरांना टाळ्यांच्या कडकडाटात निरोप दिला. 

कोरोनाच्या प्रतिबंधाकरिता देशात व राज्यात लॉकडाउन झाल्यामुळे अनेक कामगार व इतर व्यक्ती जिल्ह्यात अडकले. यातील अनेक मजूर कंपनी, जिनिंग मिल, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि रस्ता बांधकामावर काम करीत होते. कामे ठप्प झाल्यामुळे मजुरांची व्यवस्था प्रशासनाच्या माध्यमातून संबंधित कंपन्यांनी व कंत्राटदारांनी केली होती. जिल्ह्यात अडकलेल्या कामगारांची संख्या जास्त असल्यामुळे गाडी वर्धेतून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. आज सकाळी 10 वाजता ही गाडी नागपूरहून वर्ध्यात पोहोचली. जिल्ह्यातील वर्धा, सेलू, देवळी, हिंगणघाट, समुद्रपूर, आर्वी, कारंजा या तालुक्‍यांतून एकूण 670 कामगारांना विशेष बसने रेल्वेस्थानकावर आणण्यात आले. हिंगणघाट येथून 127, सेलू 103, वर्धा 112, देवळी 109, आर्वी 164, कारंजा 30 आणि समुद्रपूर येथील 25 कामगारांचा समावेश होता. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातून 349 कामगारांना वर्धा रेल्वेस्थानकावर आणण्यात आले. अशा एकूण एक हजार 19 कामगारांना मास्क, पिण्याचे पाणी आणि अन्नाची पाकिटे देण्यात आलीत. तत्पूर्वी, सर्व कामगारांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना फिटनेस प्रमाणपत्र देण्यात आले. 

अवश्य वाचा- उपराजधानीत कोरोनाबाधितांची मृत्यूसंख्या तीन, संसर्ग झालेल्यांचा आकडा १७१ वर

दुपारी उन्हाची वेळ असल्यामुळे प्रशासनाने रेल्वेस्थानकावर सावलीकरिता मंडप व स्वागत कमान, रांगोळी रेखाटून मजुरांना प्रफुल्लित वातावरणात निरोप दिला. सामाजिक अंतर राखत प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जागेवर बसविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने दक्षता घेतली. हिरवी झेंडी दाखविताच गाडी प्लॅटफॉर्मवरून सुटली तेव्हा उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवून निरोप दिला. प्रवाशांनीसुद्धा तेवढ्याच उत्साहात टाळ्या वाजवून या निरोपाचा स्वीकार केला. यावेळी आमदार रणजित कांबळे, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, पोलिस अधीक्षक बसवराज तेली, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे, शेखर शेंडे आदी उपस्थित होते. 

तुमच्या आनंदातच माझा आनंद  : पालकमंत्री केदार 

यावेळी पालकमंत्री सुनील केदार यांनी हिरवी झेंडी दाखवून रेल्वेस्थानकातून मजुरांना रवाना केले. केदार यांनी स्वगृही जाणाऱ्या मजुरांची आस्थेने चौकशी केली. तुमच्या घरी जाण्याच्या आनंदातच माझा आनंद आहे, अशी भावना व्यक्त केली.