esakal | महापालिकेच्या रस्त्यावर रेल्वेचे पाणी
sakal

बोलून बातमी शोधा

छायाचित्र

महापालिकेच्या रस्त्यावर रेल्वेचे पाणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अजनी येथील रेल्वे कॉलनीतील पावसाचे साचलेले पाणी थेट रस्त्यावर येत असून संपूर्ण डांबर वाहून गेले आहे. रस्त्यावरील डांबर निघाल्याने वाहनधारकांना गिट्टीवरून वाहने काढताना कसरत करावी लागत आहे. त्यातच रस्त्याच्या कडेलाच रेल्वे कॉलनीतल्या पाण्याच्या डबक्‍यांनी वाहनधारकांच्या मनस्तापात भर घातली असून वाहतूक कोंडी दररोजची बाब झाली आहे.

वंजारीनगर जलकुंभाजवळ रस्त्यावर महापालिकेने काही दिवसांपूर्वीच डांबरीकरण केले. मात्र, पाऊस येताच डांबर निघाले आहे. जलकुंभाला लागून अजनी रेल्वे कॉलनी आहे. या कॉलनीतील पावसाचे जमा झालेले पाणीच नव्हे तर कॉलनीतील तुंबलेल्या सिवेज लाइनचे पाणीही रस्त्यावर येत आहे. पावसाचे पाणी वाहून जाणाऱ्या ड्रेनेज लाइनची सुविधा रेल्वेने केली नसल्याने संपूर्ण पाणी जलकुंभाजवळील रस्त्यावर येत आहे. परिणामी संपूर्ण डांबर निघाले असून खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पाणी जमा होत असल्याने ते दिसेनासे झाले आहे. परिणामी खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अनेक वाहनधारक येथे घसरून पडले.

वाहतुकीची कोंडी
रेल्वे कॉलनीतून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने तसेच जलकुंभाच्या भिंतीच्या बाजूलाच काही दिवसांपूर्वी खोदण्यात आलेला खड्डा योग्यरित्या न बुजविल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. टीबी वॉर्डकडून वाहन येत असल्यास बाबूळखेडा किंवा दक्षिण नागपुरातील कुठल्याही वस्तीतून येणाऱ्या वाहनधारकांना काही वेळ थांबावे लागत आहे. रेल्वेने कॉलनीतील पाणी वाहून जाण्यासाठी कुठलीही सोय न केल्याने महापालिका रस्त्याची दुरवस्था झाली आहे. एकीकडे गेल्या अनेक वर्षांपासून तुकडोजी पुतळा ते थेट अजनी पुलापर्यंतचा रस्ता रेल्वेने रोखून धरला आहे. आता त्याच कॉलनीतील पाणी रस्त्यावर सोडले जात आहे. रस्ता रोखून धरत कोंडी करणारी रेल्वे पावसाळ्यात महापालिकेच्या रस्त्याचीही दुर्दशा करीत आहे.

रस्ता झाला अरुंद
रेल्वेचे पाणी बाहेर येत असल्याने या रस्त्याच्या बाजूलाच मोठे डबके तयार झाले आहे. दुसऱ्या बाजूला जलकुंभाच्या भिंतीजवळ खड्ड्याचे पुनर्भरण न केल्याने रस्ता अरुंद झाला आहे. परिणामी वर्दळीच्या या रस्त्यावर वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

loading image
go to top