esakal | या रस्त्याच्या पुलावरून प्रवास करताय...जरा सांभाळून, सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेत
sakal

बोलून बातमी शोधा

पांढरी : घटेगाव पुलावर पडलेले खड्डे.

एखाद्या रस्त्याच्या पुलावरून प्रवास करणे नागरिकांसाठी धोकादायकच ठरत आहे. रस्तेच ओबडखाबड असल्याने पूल तरी कसे चांगले राहणार, याचा प्रत्यय सडक अर्जुनी तालुक्‍यातील एका रस्त्यावर आला. घटेगावच्या पुलावर खड्डेच खड्डे असल्याने प्रवाशांसाठी ते धोकादायक ठरत आहे.

या रस्त्याच्या पुलावरून प्रवास करताय...जरा सांभाळून, सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेत

sakal_logo
By
जितेंद्र चन्ने

पांढरी (जि. गोंदिया) : सडक अर्जुनी तालुक्‍यातील पांढरी जिल्हा परिषद क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या घटेगाव पुलावर खड्डेच खड्डे पडले आहेत. परिणामी, आवागमन करणाऱ्या नागरिकांसाठी हे खड्डे कधीही धोकादायक ठरू शकतात. असे असताना सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. अपघातात जीव गमावल्यावर संबंधित विभागाला जाग येईल काय, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.


गोंदिया जिल्ह्यातील कोसमतोंडी, गिरोला, चिचटोला, बेहळीटोला, मुंडीपार/ई., धानोरी, लेंडेझरी, मुरपार, थाडेझरी आदी गावातील नागरिकांना सडक अर्जुनी तालुकास्थळाकडे जाण्यासाठी घटेगाव कमी अंतराचा मार्ग आहे. त्यामुळे नेहमीच या मार्गावर प्रवाशांची वर्दळ असते. पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे येथे अपघाताच्या बऱ्याच घटना घडल्या आहेत.

गावविकास झाला पण रस्त्याचा विकास नाही

लोकप्रतिनिधींनी या परिसरात गावविकासाची बरीच कामे केली, यात तिळमात्र शंका नाही. मात्र, जिल्हा परिषद सदस्याच्या गावामधील पुलावरील खड्डे दुरुस्त न होणे, ही शोकांतिका म्हणावी लागेल. दरवर्षी पावसाळा सुरू होण्याच्यापूर्वी विभागामार्फत मुरूम टाकून खड्ड्यांची लिपापोती करण्यात येते. खड्ड्यांच्या डागडुजीच्या नावावर कित्येक रक्कम खर्च केली जाते. पण एक दिवसाच्या हलक्‍या पावसामुळे विभागाच्या लिपापोतीची पोल निदर्शनास येते.

हेही वाचा : लग्न कर्तव्य आहे का? चांगली वधू आहे, असा फोन आल्यास सावधान!


पुलावरील खड्डे देतात अपघाताला आमंत्रण

दरम्यान, पुलावरील खड्ड्यांच्या मेंटेनन्सच्या नावावर विभाग करतो काय, असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. सद्यःस्थितीत हलक्‍या पावसामुळे या पुलावर खड्ड्यांसह चिखलाचे साम्राज्य दिसून येते. त्यामुळे ये-जा करताना प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागते. संबंधित विभागाने लवकरात लवकर या पुलावरील खड्ड्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांसह प्रवाशांनी केली आहे.