वृक्षारोपणाची कोटींची उड्डाणे; पण जगवायची कशी?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मे 2019

पाण्यामुळे ७५ टक्के जिवंत झाडे
कोल्हापूर - गेल्या तीन वर्षांत सुमारे ८० लाख रोपे लावण्यात आली. यामध्ये स्थानिक प्रजातींची संख्या अधिक असून, ही रोपे सामाजिक वनीकरणासह खासगी रोपवाटिकेतून विकत घेतलीत. झाडांचे निरीक्षण जीपीएस पद्धतीने होते. ठिबक, तुषार सिंचनाप्रमाणे टॅंकरद्वारे पाणी देण्यात येते. जेवढी झाडे लावली, त्यापैकी ७५ टक्‍क्‍यांवर रोपे जगल्याचा दावा आहे. मोहिमेमुळे गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, चंदगड, आजरा, भुदरगड या डोंगराळ तालुक्‍यातील हरीत पट्ट्यात वाढ झाल्याचे सामाजिक वनिकरण विभागाचे निरीक्षण आहे. भविष्यात कोल्हापूरमधील हरित पट्टा अधिक दाट होईल, असे सामाजिक वनीकरणचे सहाय्यक वनसंरक्षक सुहास साळोखे यांनी म्हटले आहे.

तापमानाचा पारा उंचावतानाच रुसलेल्या पर्जन्यराजाला प्रसन्न करण्यासाठी वृक्षारोपणाची कोटीची उड्डाणे राज्यात मारली. पण प्रत्यक्षात झाडे जगवण्याची बोंब आहे. तेरा कोटी वृक्षलागवडीचा डंका पिटला. मात्र यापूर्वीची किती झाडे जगली, याचा धांडोळा सर्वेक्षणापलीकडे घेण्याची आवश्‍यकता यंत्रणांना भासलेली नाही. ‘सकाळ’च्या बातमीदारांनी टिपलेले वृक्षलागवडीचे धगधगते वास्तव...

खडकाळ जमिनीत फसलेले वृक्षारोपण
नागपूर - खडकाळ आणि मुरमाड जमिनीत अनेकदा वृक्षारोपणाचा प्रयत्न होतो, पण तो फसला. नागपूरपासून सात किलोमीटरवरील अंबाझरी परीक्षेत्रात अनेक वर्षे वृक्ष लागवड झाली नाही. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चार वर्षांत ५० कोटी वृक्षलागवडीच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेची घोषणा केली. तेव्हाच काही वनाधिकाऱ्यांनी नकारघंटा वाजवली. पण वनमंत्र्यांपुढे काही चालले नाही.

वनाधिकाऱ्यांनी जागा शोधल्या. त्यापैकीच दहा हजार वृक्षलागवडीसाठी निश्‍चित केलेली अंबाझरीची जागा. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. वनाधिकाऱ्यांनीही वृक्षारोपण केले. खडकाळ जमीन, मुरमामुळे अनेक झाडे उन्हाच्या तडाख्याने पहिल्यावर्षीच जळाली.

सरकार दप्तरी ८० टक्के वृक्ष जिवंत असले, तरी वास्तव वेगळेच आहे. आता ३३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. त्याचे युद्धपातळीवर काम सुरू असले तरी जागांचा प्रश्‍न बिकट आहे.

पावसाची पाठ अन्‌ रोपांची वाट 
नाशिक - जिल्ह्यात तीन वर्षांत वृक्ष मरण्याची संख्या ३९ लाखांपुढे पोचली आहे. जिल्ह्यात जुलैनंतर पावसाची ओढ राहिली. पावसाचे दिवस घटल्याने जलस्त्रोत आटले. वनहक्क दावे निकाली काढण्याच्या कामात वृक्ष लागवडीकडे दुर्लक्ष राहिले. उन्हाळ्यात रोपं जगवण्यापेक्षा नव्या वर्षातील १ कोटी ४८ लाख वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टाच्या पूर्ततेच्या आकडेमोडीत यंत्रणा मश्‍गुल आहे.

पाण्याअभावी जळाली ४० टक्के झाडे
सोलापूर - रोपे जगवण्यासाठी महापालिका, ग्रामपंचायत, सामाजिक वनीकरण, वन विभागाची धावपळ होत आहे. जिह्यात जिवंत रोपे ६० टक्केच आहेत. सामाजिक वनीकरण आणि वन विभाग यांची ७५ टक्के रोपे जिवंत आहेत. महापालिकेच्या वतीने लावलेल्या झाडांकडे सुरवात वगळता नंतर कोणाचेही लक्ष नाही.

झाडे जगण्याचे प्रमाण ५ टक्के
नगर -
 तिसऱ्या टप्प्यात नगर जिल्ह्यात ५५ लाख १२ हजार १७३ वृक्षलागवडीचे उद्दिष्ट होते. जिल्ह्यात चार विभागांनी ३० लाख ४० हजारांवर वृक्षलागवड केली. वृक्षांच्या ऑक्‍टोबरमधील सर्व्हेमध्ये २७ लाखांवर झाडे जिवंत आढळली. ग्रामपंचायत, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम अशा सरकारी २७ विभागांनी १० लाखांवर झाडे लावली. त्यापैकीे साडेआठ लाखांवर जिवंत राहिली. पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे लागवड केलेले ९५ टक्के वृक्ष जळाले. त्यामुळे जिल्ह्यात वृक्षलागवडीमधील पाच टक्के झाडे जिवंत आहेत, असे सांगता येईल, पण त्याची ठोस आकडेवारी वनविभागाकडे नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tree Plantation Water Shortage Water Supply